नागपूर : मिहान येथील एअर इंडिया एमआरओचे अभियंता मार्च पर्यंत एअरबस ३२० व बोईंग ७३७ विमानांच्या देखभालीच्या प्रशिक्षणासाठी देशातील दुसऱ्या एमआरओत जाऊ शकतात. हे अभियंता तेथे ३ ते १२ महिन्यांपर्यंत प्रशिक्षण घेऊ शकतात. ही कसरत नागपूरच्या एअर इंडिया एमआरओसाठी युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (ईएएसए) च्या प्रमाणपत्रासाठी करण्यात येत आहे. हे मानांकन मिळाल्यानंतर नागपूर एमआरओचा व्यवसाय दुप्पट होण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
एअर इंडिया इंजिनिअरींग सर्व्हिसेस लिमिटेडचे महाप्रबंधक पदाचा कार्यभार सांभाळणारे सत्यवीर करतार सिंह यांनी सांगितले की, एमआरओमध्ये उपलब्ध सुविधांचा वापर करून व्यवसाय वाढविण्यावर भर देण्यात येईल. कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणानंतर ‘ईएएसए’ची टीम एमआरओमध्ये ऑडिट करण्यासाठी लवकरच पोहोचणार आहे. लवकरच येथे उपकरणांच्या कॅलिब्रेशनसाठी शॉप सुरु करण्यात येईल. यामुळे कामात आणखी गती येईल. उल्लेखनीय म्हणजे सी. बी. कारखानीस यांची मुंबईला बदली झाल्यानंतर मुंबई एमआरओत उपमहाव्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले सत्यवीर सिंह नागपूर एमआरओमध्ये पदोन्नतीसह महाव्यवस्थापकाची जबाबदारी सांभाळत आहेत.
..............