मेडिकलशेजारी की मिहान प्रकल्पात : गडकरी, फडणवीस करणार चर्चा नागपूर : उपराजधानीत होऊ घातलेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या (एम्स) जागेचा तिढा येत्या २६ नोव्हेंबर रोजी सुटण्याची शक्यता आहे. सूत्रानुसार, येत्या बुधवारी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एम्सच्या जागेच्या संदर्भात चर्चा करून हा विषय निकाली काढणार असल्याची माहिती आहे.केंद्राच्या २२०० कोटी रु पयांचा हा प्रकल्प मेडिकलशेजारी उभा राहणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली. त्यानुसार टीबी वॉर्डाच्या ५५ एकर जागेवर एम्स रुग्णालय, मध्यवर्ती कारागृहामागील व लघुसिंचन विभाग मिळून असलेल्या १३० एकर जागेवरील सागवानाची झाडे आणि मोकळ्या परिसरात महाविद्यालय तसेच अजनी रेल्वेस्थानकासमोर असलेल्या मेडिकल वैद्यकीय वसाहतीच्या १७ एकर जागेवर वसतिगृह व डॉक्टरांचे निवासस्थान उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. परंतु टीबी वॉर्डाच्या जागेवर क्षयरोग व त्वचारोग या दोन विभागासह मेडिकलच्या कर्मचाऱ्यांचे असलेले निवासस्थान व इतरही जागेवर असलेले बांधकाम काढणे सहज शक्य नाही. यात वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात लागण्याची शक्यता आहे. नुकतेच रामगिरी या सरकारी निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिहान प्रकल्पात सेझखेरीज दोन ते अडीच हजार एकर जमिनीवर एम्स संस्था स्थापन करण्याचे सुचवले. एम्समुळे मिहानमधील मेडिकल हबला मदत होईल, असेही ते म्हणाले. यामुळे मेडिकलच्या शेजारी ‘एम्स’ होते की मिहानमध्ये याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एम्सच्या जागेचा तिढा सुटण्यासाठी लवकरच गडकरी आणि फडणवीस चर्चा करणार आहेत. (प्रतिनिधी)
एम्सच्या जागेचा तिढा सुटणार!
By admin | Updated: November 21, 2014 00:47 IST