‘एम्स’च्या चमूने केली मेडिकलची पाहणी : २०१८ पासून सुरू होईल शैक्षणिक सत्रनागपूर : जागतिक आरोग्य दिनाच्या पूर्वसंध्येला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) चमूने गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची (मेडिकल) पाहणी केली. यावेळी मेडिकलमध्ये वेगळ्या २०० खाटांच्या मदतीने एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला २०१८-१९ मध्ये सुरुवात करण्याचे संकेत दिले. ‘एम्स’ला आवश्यक असणाऱ्या एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला पुढील वर्षापासून सुरुवात होत आहे. सुरुवातीला एमबीबीएसच्या ५० जागा भरल्या जातील. यासाठी साधारण चार वर्षांसाठी तात्पुरते महाविद्यालय व रुग्णालयाच्या पाहणीसाठी ही चमू आली होती. यामध्ये नागपूर ‘एम्स’चे विशेष कार्य अधिकारी डॉ. महेश मिश्रा, बाजपेयी, पंतप्रधान आरोग्य योजनेचे सुदीप श्रीवास्तव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे व स्थानिक प्रतिनिधी म्हणून डॉ. वीरल कामदार उपस्थित होते. सुरुवातीला मिहानमध्ये २५२ एकरमध्ये तयार होणाऱ्या ‘एम्स’ची सुरक्षा भिंत व इतर बांधकामाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर चमूने मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्यासोबत कॉलेजची पाहणी केली. यात क्लास रूम, प्रयोगशाळा, भविष्यात होणारे प्रशासकीय कार्यालय व संचालकांच्या निवासस्थानालाही भेट देण्यात आली. दंत महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहात ‘एम्स’च्या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करण्याची प्राथमिक तयारी करण्यात आली आहे. या निरीक्षणाचा अहवाल लवकरच मंत्रालयाकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. वीरल कामदार यांनी दिली. ते म्हणाले, या पाहणीत ओएसडी डॉ. मिश्रा सर्व तयारीबाबत सकारात्मक होते. (प्रतिनिधी)
२०० खाटांसोबत सुरू होईल ‘एम्स’
By admin | Updated: April 7, 2017 02:51 IST