नागरिकांमध्ये भीती : सेमिनरी हिल्स, गिट्टीखदान परिसरात पप्पू मिश्राची दहशतनागपूर : सुमित ठाकूरच्या दहशतीच्या पाठोपाठ आणखी एका युवा भाजपा पदाधिकाऱ्याच्या गुंडगिरीमुळे सेमिनरी हिल्स व गिट्टीखदान परिसरातील नागरिक त्रस्त असून दहशतीत जगत आहेत. अखिलेश ऊर्फ पप्पू मिश्रा असे त्याचे नाव असून, तो भाजप झोपडपट्टी आघाडीच्या युवा मोर्चाचा सचिव आहे. सेमिनरी हिल्स भागातील टीव्ही टॉवर, धम्मनगर, कृष्णनगर, भीमटेकडी, गिट्टीखदान, पंचशीलनगर, आयबीएम मार्ग आदी भागात पप्पू मिश्रा याचा दबदबा आहे. या भागामध्ये गांजा, दारू, जुगार, चरस या धंद्याबरोबरच वेश्याव्यवसायाचा जोर वाढला आहे. शिकवणी किंवा महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींवर अश्लील शेरेबाजी करणे, त्यांना वेठीस धरणे, धमक्या देऊन त्यांना शरीरविक्री करण्यास भाग पाडणे, न ऐकल्यास जीवे मारण्याच्या किंवा कुटुंबातील सदस्यांना इजा करण्याच्या धमक्यांनी लोक त्रस्त आहेत. या सर्वांमागे पप्पू मिश्राच आहे. बाहेरच्या वस्त्यांमधून उनाड तरुणांना पप्पू मिश्राचा आशीर्वाद आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वस्तीतील नागरिक हा सर्व प्रकार सहन करीत आले आहेत. परंतु मागील दोन वर्षांपासून हा प्रकार अधिकच वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी या प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी सुरुवातीला लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली. परंतु काहीही झाले नाही. त्यानंतर पोलीस व स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या; मात्र काहीही कारवाई झालेली नाही. येथील लोक आता एकजूट झाले आहेत. या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या शशिकला वडे यांच्या नेतृत्वात येथील नागरिक आता एकजूट होऊन येथील अवैध धंद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या न्यायासाठी ते लढत आहेत. कारवाई का नाही? पप्पू मिश्रा हा कुख्यात गुन्हेगार आहे. तो दहशतीचे वातावरण निर्माण करतो, त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत, याची पोलिसांना कल्पना आहे. त्याच्याविरुद्ध मोठ्या संख्येने नागरिक तक्रार करतात, असे असूनही गिट्टीखदान पोलीस त्याच्यावर कारवाई का करीत नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पप्पू मिश्रा हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने राजकीय लोकांकडून पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्ते नागरिकांनी केला आहे. भीमसेना रस्त्यावर उतरणार यापूर्वी सुमीत ठाकूरच्या गुंडगिरीला पोलिसांनी खतपाणी घातले. आता पप्पू मिश्राला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गिट्टीखदान परिसरातील नगरिक दहशतीत जीवन जगत आहेत. पोलिसांकडून त्याला तातडीने न्याय न मिळाल्यास भीमसेना रस्त्यावर उतरून आंदोलन केरल, असा इशारा भीमसेनेचे आकाश टेंभुर्णे, बबू कोरी, दुर्गा लाहोरी, भूषण बनसोड यांनी दिला आहे. आंदोलनकर्ते नागरिकांची पोलीस ठाण्यावर धडकपप्पू मिश्राच्या दहशतीविरुद्ध नागरिकांनी आवाज उचलला. तो कुख्यात गुन्हेगार असूनही त्याच्याविरुद्ध काहीच कारवाई करण्यात आली नाही. उलट आंदोलनकर्त्या नागरिकांच्या विरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करण्यात येत आहे. रवींद्र उके यांच्याविरुद्ध छेडखानीची अशीच एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. उके हे पप्पू मिश्राच्या विरोधातील आंदोलनकर्त्यांपैकी एक आहेत. त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल होताच गिट्टीखदान पोलीस लगेच कारवाई करण्यास तयार झाले. त्यामुळे आंदोलनकर्ते नागरिक संतापले आहेत. शनिवारी त्यांनी पोलीस ठाण्यावर धडक देऊन याविरुद्ध आपला संताप व्यक्त केला. कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या रेकॉर्डनुसार गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीतील क्रिष्णानगर येथे राहणारा पप्पू ऊर्फ अखिलेश मिश्रा हा कुख्यात गुन्हेगार आहे. संघटित टोळीच्या साहाय्याने त्याने गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे केले आहेत. त्याच्याविरुद्ध गिट्टीखदान पोलीस ठाण्यासह जरीपटका, सदर, अंबाझरी व बुटीबोरी पोलीस ठाण्यात प्राणघातक शस्त्रे घेऊन दुखापत, घरावर चालून जाणे, शस्त्र बाळगणे, दरोडा, अश्लील शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे, मालमत्तेचे नुकसान करणे, शस्त्राचा धाक दाखवून लूटपाट करणे, दंगा करणे आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध तडीपार आणि मोका अंतर्गतसुद्धा कारवाई करण्यात आली होती. मात्र त्याच्या गुंडगिरीला आळा बसला नाही. समाजभवन परिसरात अतिक्रमण, अवैध धंदे सर्रास सेमिनरी हिल्स परिसरातील भीमटेकडी या परिसरात दलित समाजातील लोक बहुसंख्येने राहतात. या ठिकाणी एक समाजभवन उभारण्यात आले आहे. त्यात सर्वच धर्माचे धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. पप्पू मिश्रा याने या समाजभवनासमोरच अवैध बांधकाम केले असून त्यात राजरोसपणे अवैध धंदे सुरू असतात. परिसरातील कुणी विचारलेच तर त्याला शिवीगाळ केली जाते किंवा जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प बसविले जाते. चरस, गांजा पिणारे येथे पडून असतात. येथे वेश्याव्यवसायसुद्धा चालत असल्याचे येथील नागरिक सांगतात. पोलिसांनासुद्धा याची माहिती आहे, परंतु पोलीस कारवाई करीत नसल्याचा येथील नागरिकांचा आरोप आहे.
पुन्हा एका भाजप पदाधिकाऱ्याची गुंडगिरी
By admin | Updated: November 15, 2015 02:03 IST