- स्व. प्रकाश लुंगे नाट्यमहोत्सव : नाट्यरसिक झाले गदगद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तब्बल दहा महिन्यांनंतर नागपुरात पारंपरिक हौशी रंगभूमीला चेतना देण्याचे काम नाट्यपरिषदेच्या महानगर शाखेच्या स्व. प्रकाश लुंगे नाट्यमहोत्सवाने दिले. त्याअनुषंगाने सायंटिफिक सभागृहात नाट्यरसिकांची गर्दी उसळली होती.
रविवारी या नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन बहुजन विचार मंचाचे संयोजक नरेंद्र जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी गिरीश गांधी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते जयंत गाडेकर, सेलेब्रिटी शेफ विष्णू मनोहर, ज्येष्ठ रंगकर्मी अनिल चनाखेकर आणि राष्ट्रसंत तुकडॊजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाच्या प्रमुख डॉ. संयुक्ता थोरात उपस्थित होते. यावेळी विनोद कुळकर्णी, मदन गडकरी, अरविंद पाठक, गणेश नायडू, मधू जोशी, विजय वाटाणे, रमेश अंभईकर, मधुसुदन वेलणकर, रंजन दारव्हेकर, गजानन सगदेव, बळवंत लामकाणे, बाळासाहेब देशपांडे, निलकांत कुलसंगे, प्रकाश देवा, कमल वाघधरे, सुनंदा साठे, बाबा धुळधुळे यांना रंगसेवाव्रती सन्मान प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य प्रयोग परीनिरीक्षण मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्रभाकर दुपारे, दिलीप ठाणेकर आणि किशोर आयलवार यांनाही सन्मानित करण्यात आले. महानगर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. विनोद राऊत यांनी केले, तर आभार पूजा पिपंळकर यांनी मानले. संजय भाकरे फाउंडेशनच्या नाटकाने महोत्सवास प्रारंभ झाला.
रंगकर्मींचे ‘पिंपळपान’
महोत्सवाच्या दर्शनी भागात सुरेख अशी पिंपळपान वृक्षाची आकृती साकारण्यात आली होती. यात शहरातील सर्व रंगकर्मींची नावे कोरण्यात आली होती. सौरभ दास यांनी साकारलेल्या या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत होते.
मधातच पडदा पडल्याने रंगकर्मी नाराज
नाट्यमहोत्सवादरम्यान तिसऱ्या क्रमांकाला सादर झालेल्या ‘मधुशाला के कारागीर’ या नाटकादरम्यान अचानक पडदा पाडण्यात आल्याने रंगकर्मी नाराज झाले. याबाबत नाटकाचे लेखक गजानन जैस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना नवोदितांना अशा तऱ्हेने डावलले जात असेल तर नागपुरात नाट्यचळवळ कशी चालेल, असा प्रश्न उपस्थित केला.
महानगर शाखेचा निषेध
नाट्यमहोत्सवात एखादी एकांकिका, एखादा दीर्घांक असू शकतो. नवोदितांना प्रोत्साहन देण्याचा हेतू नाट्यपरिषदेचा असावा. त्या हेतूला महानगर शाखेने हरताळ फासला आहे. नाटक लांबले म्हणून पडदा पाडणे आयोजकांना योग्य वाटत असेल तर नाट्यमहोत्सव दोन तास उशिरा का सुरू केला, हा आमचा प्रश्न आहे. यापुढे महानगर शाखेच्या कोणत्याही उपक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत.
- जयंत बन्लावार, संस्थापक : हेमेंदू रंगभूमी