कन्हान : अतिक्रमण हटविण्यात अन्याय करण्यात आल्याचा आराेप करीत नागरिकांनी स्थानिक पालिका कार्यालयासमाेर साखळी उपाेषणाला सुरुवात केली हाेती. आंदाेलनाच्या सातव्या दिवशी कन्हान-पिपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश बन्नाेरे यांनी उपाेषणकर्त्यांशी चर्चा करून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हे आंदाेलन सातव्या दिवशी मागे घेण्यात आले.
पालिका प्रशासनाने शहरातील ३० अतिक्रमणधारकांना त्यांचे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात नाेटिसा बजावल्या हाेत्या. त्यातच प्रशासनाने माेरेश्वर खडसे यांचे निर्माणाधीन बांधकाम पाडले. ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आराेप करीत माेरेश्वर खडसे यांनी साखळी उपाेषणाला सुरुवात केली हाेती. प्रशासन या आंदाेलनाची दखल घेत नसल्याने काहींनी या आंदाेलनाच्या समर्थनार्थ साेमवारी अर्धनग्न आंदाेलनही केले.
दरम्यान, उदयसिंग यादव यांनी मध्यस्थी करीत उपाेषणकर्ते व प्रशासन यांची पुन्हा भेट घडवून आणली. यात पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश बन्नाेरे व ठाणेदार अरुण त्रिपाठी यांनी उपाेषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे त्यांनी आंदाेलन मागे घेतले. त्यानंतर आंदाेलकांनी शहरात मूक माेर्चा काढला. या चर्चेत उदयसिंग यादव, माेरेश्वर खडसे, चंद्रशेखर भिमटे, अंबादास खंडारे, शक्ती पात्रे, कुणाल लोंढे, अमर पात्रे, अशोक पाटील, नरेश सोनेकर, आकीब सिद्दीकी, अनवर खडसे, निखिल खडसे सहभागी झाले हाेते.