तब्बल सहा तास प्रवाशांची कुचंबणा : मेट्रो रेल्वेनेही केली कोंडी नागपूर : वर्धा मार्गावर शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे हजारो प्रवाशांना तब्बल सहा तास मनस्ताप सहन करावा लागला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गिरनार कट परिसरात शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास अचानक दुचाकी स्वार समोर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रेलर (एमएच ४०/ एन ४२९०) चालकाने दुभाजक तोडून वाहन दुसऱ्या मार्गावर वळवले. तेवढ्यात त्या मार्गाने भरधाव ट्रक (डब्ल्यूबी ३३ / सी ४३८३) आल्यामुळे ट्रक आणि ट्रेलरची जोरदार टक्कर झाली. त्यामुळे ट्रेलर चालक गणेश जयराम कावळे (वय २८, रा. शिवशक्तीनगर पारडी) आणि ट्रक चालक सपन महातो (३०) तसेच क्लिनर सुबोध महातो (२३, रा. दोघेही मिदनापूर, प. बंगाल) हे गंभीर जखमी झाले. अपघातामुळे दोन्ही अवजड वाहने रस्त्यावर आडवी आली. त्यात काही उत्साही वाहनचालकांनी मध्येच वाहन घातल्याने दोन्ही मार्गावरचा रस्ता बंद झाला. अपघाताची माहिती कळताच हिंगण्याचे ठाणेदार हेमंत कुमार खराबे आणि पोलीस निरीक्षक मोरेश्वर बारापात्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना मेडिकलमध्ये पाठविले तर, रखडलेली वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, वाहने काढण्याला जागाच नसल्याने आणि दोन्हीकडून वाहनांचे येणे सुरूच असल्याने रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहने उभी झाली. त्यामुळे यात बसलेले रुग्ण, त्यांचे नातेवाईक, शाळकरी मुले वृद्ध आणि रोजगारांच्या निमित्ताने नागपुरात येणाऱ्यांची तीव्र कुचंबणा झाली.तब्बल सहा तास या सर्वांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. वाहनांची कोंडी होण्यासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाचाही हातभार लागला. या कामामुळे रस्त्यात ठिकठिकाणी बांधकामासाठी वापरले जाणारे साहित्य पडून असल्याने वाहनांवर मशिनरींसह, अवजड साहित्य पडण्याचा धोकाही वाढला होता. त्याचमुळे अनेक वाहन चालकांनी जागच्या जागीच थांबणे पसंत केले.
अपघातानंतर वर्धा मार्गावर जाम
By admin | Updated: August 28, 2016 02:02 IST