- यशवंत मनोहर : ‘मुक्तिबोधांचा साहित्यविचार’ व्याख्यानमाला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शरच्चंद्र मुक्तिबोध यांनी तत्कालीन भारतीय साहित्य विचार आणि मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र खोडून काढत नवा मानुष्यसिद्धांत प्रस्थापित केला. भारतीय संस्कृत साहित्यातला रससिद्धांत आणि मराठीतील मर्ढेकरांचा मयसिद्धांत या सौंदर्यशास्त्रातील पुरुषार्थाचा धिक्कार मुक्तिबोधांनी केला आणि हे सिद्धांत सरंजामशाही व विषमतेला प्रेरित करणारे असल्याचे स्पष्ट करत त्यांनी सौंदर्यशास्त्रातील मानुष्यसिद्धांत प्रकट केल्याचे मत प्रख्यात आंबेडकरवादी चिंतक प्रा. डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.
प्रा. शरच्चंद्र मुक्तिबोध यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा मराठी विभाग आणि विदर्भ साहित्य संघाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत मनोहर बोलत होते. ‘मुक्तिबोधांचा साहित्य विचार’ या विषयावर त्यांनी व्याख्यान गुंफले. या आभासी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून वि.सा. संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर उपस्थित होते.
भारतीय साहित्य विश्वातील सौंदर्यशास्त्रातील पुरुषार्थ हा मूठभर अभिजनांच्या वृत्तीला चालना देणारा होता. रससिद्धांत हा शोषणाचा सिद्धांत असून, आधुनिक साहित्याचे समीक्षण या सिद्धांताने शक्य नाही. संवेदना शुद्ध असतात आणि त्याला नियमांचे आवरण घालता येत नाही. म्हणूनच रस आणि लय सिद्धांत भ्रष्ट असल्याचे ठाम मत मुक्तिबोधांचे होते, असे मनोहर म्हणाले. साहित्य ही भ्रष्ट कला नसून ती संवादी संघटना आहे आणि कलावंतांच्या जाणिवेतूनच ते आकार घेत असते. त्या जाणिवेतील द्वंद्वांतूनच त्याची जडणघडण होत असते, असे भाव यशवंत मनोहर यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले. संचालन ऋचा वगरकर-मांजरखेडे यांनी केले.
......