स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर : इ.झेड.खोब्रागडे यांचे प्रतिपादननागपूर : शासनाच्या अनेक योजना असतात. या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य प्रशासकीय अधिकारीच करीत असतात. त्यामुळे प्रशासकीय सेवा ही समाजसेवाच आहे, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्य करा, असे आवाहन माजी सनदी अधिकारी इ.झेड. खोब्रागडे यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि डॉ. आंबेडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या कुंभारे सभागृहात केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. उद्घाटक म्हणून ते बोलत होते. स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले हे अध्यक्षस्थानी होते. स्मारक समितीचे सदस्य व्ही.टी.चिकाटे, विलास गजघाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. सी. पवार, आयकर उपायुक्त क्रांती खोब्रागडे, आयकर उपायुक्त धनंजय वंजारी आणि विजय ढोके प्रामुख्याने उपस्थित होते. इ.झेड. खोब्रागडे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थी ते सनदी अधिकारी या काळात त्यांच्या जीवनात आलेल्या चांगल्या व वाईट प्रसंगांचा अनुभव कथन करीत अनेक समस्यांना तोंड देत आपले कार्य कसे सुरळीत पार पाडले हे सांगितले. क्रांती खोब्रागडे यांनी प्रशाकीय सेवेत येण्यासाठी कशा प्रकारे परिश्रम घेतले व अभ्यास कसा केला, याचे मार्गदर्शन केले. धनंजय वंजारी यांनी युपीएससी व एमपीएससी या दोन्ही परीक्षेचे महत्त्व स्पष्ट करीत अभ्यास आणि अध्ययन या दोन्ही गोष्टी कशा वेगवेगळ्या आहेत आणि अध्ययनाला कसे महत्त्व आहे, हे पटवून दिले. यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरेही देण्यात आली. व्ही.टी. चिकाटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गौतम कांबळे यांनी संचालन केले. डॉ. अर्चना मेश्राम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) २९ वर्षात २१ बदल्या माजी सनदी अधिकारी इ.झेड. खोब्रागडे यांनी आपल्या भाषणात त्यांच्या कार्यकाळातील अनेक किस्से सांगितले. यातच २९ वर्षात त्यांच्या २१ बदल्या झाल्याचे सांगत इतक्या बदल्या होणारा कदाचित मी पहिलाच अधिकारी असेल, असेही सांगितले.
प्रशासकीय सेवा ही समाजसेवाच
By admin | Updated: August 28, 2016 02:27 IST