तीन महिन्यातच झाली बदली नागपूर : अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. सुहास वारके यांची दहशतवाद विरोधी पथकात (आयजी, एटीएस) मुंबईला बदली झाली आहे. कोणतीही चर्चा अथवा कोणतेच संकेत नसताना डॉ. वारके यांची बदली झाल्याने शहर पोलीस दलाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.विशेष म्हणजे, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिरिक्त पोलीस आयुक्तपद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सहआयुक्तांच्या अनुपस्थितीत ऐनवेळी अतिरिक्त आयुक्त निर्णय घेतात. मोक्कासारखा गंभीर गुन्हा लावायचा असल्यास अतिरिक्त आयुक्तांचीच मंजुरी घ्यावी लागते. मुख्यमंत्र्यांचे गृहनगर असलेल्या नागपुरात अतिरिक्त पोलीस आयुक्तांची तीन पदे मंजूर आहेत. डॉ. वारके तीन महिन्यांपूर्वीच नागपुरात रुजू झाले होते. नागपुरातील एकमात्र अतिरिक्त आयुक्त म्हणून ते शहर पोलीस दलात जबाबदारी सांभाळत होते. ( सहा महिन्यांपासून गुन्हेशाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी रंजनकुमार शर्मा सक्षमपणे सांभाळत आहेत.) अभ्यासू आणि मितभाषी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे डॉ. वारके नागपुरात रुळण्यापूर्वीच त्यांची एटीएस मुंबईला बदली करण्यात आल्याची वार्ता शनिवारी नागपुरात पोहचली. फेरबदलाचे वारे शहर पोलीस दलात फेरबदलाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. येथील आयुक्तांकडून मात्र त्यास कसलाही दुजोरा नाही. त्यामुळे काही जणांकडून जाणीवपूर्वक फेरबदलाची वार्ता पेरली जात असल्याचेही काही अधिकाऱ्यांचे मत आहे. काही पोलीस ठाण्यातील निरीक्षकांची उचलबांगडी मात्र निश्चित मानली जात आहे.
अतिरिक्त आयुक्त वारके आता मुंबई एटीएसमध्ये
By admin | Updated: September 25, 2016 03:15 IST