लोकमत न्यूज नेटवर्क
कुही : तालुक्यातील अडम ते हुडपा या डांबरी रस्त्यात जागाेजागी खड्डे पडले असून, रहदारीला अडसर ठरत आहे. परिणामी या भागातील गावकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मांढळ येथून अडम ते हुडपा मार्ग माैदा तालुक्याला जाेडणारा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. माैदा, भंडारा येथे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असून, मांढळ, चापेगडी, साळवा, हुडपा अडम येथील मजूर, नाेकरदार, शेतकरी, व्यावसायिक याच मार्गाने ये-जा करतात. त्यामुळे मार्गावर वर्दळीचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. भंडारा-वेलतूर-आंभाेरा मार्गे बसफेरी सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. रस्त्याच्या दैनावस्थेमुळे वाहनचालकांसह प्रवाशांना नाहक त्रास साेसावा लागताे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष पुरवून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी प्रमाेद घरडे, राजू कांबळे, याेगेश केळझरकर, वनवास रामटेके, मधुकर कावळे, सुरेश चव्हाण यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे.