नागपूर : चित्रपट क्षेत्रातील सदाबहार अभिनेता, दिग्दर्शक राजकपूर आज नाहीत पण त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृती मात्र रसिकांच्या भावनांना हात घालणाऱ्या आहेत. शो मॅन राजकपूर यांच्या चित्रपटांशिवाय चित्रपट सृष्टीचा इतिहास अपूर्ण राहील. संगीताची जाण असणाऱ्या राजकपूर यांच्या चित्रपटातील गीतेही अमिट गोडीची आहेत कारण त्यांनी संगीताकडे प्रामुख्याने लक्ष दिले. त्यांच्या चित्रपटातील भावकाव्याची, सुरेल स्वरांची आणि अनोख्या अनुभूतीची मधुर गीते रसिक श्रोत्यांच्या मनात कायम रुंजी घालत असतात. अशाच अवीट गीतांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण सायंटिफिक सभागृहात करण्यात आले. सप्तरंग कला प्रतिष्ठानतर्फे राजकपूर यांच्या स्मरणार्थ ‘जाने कहाँ गये वो दिन..’ या श्रवणीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बहुतांश हौशी गायकांच्या सहज गायनाने आणि समरसतेने कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमाची संकल्पना डॉ. सुधीर कुन्नावार यांची होती. आरती बुटी, मनश्री जोशी, स्मिता टोणगावकर, यशश्री भावे, डॉ. सुधीर कुन्नावार, शशिकांत वाघमारे, डॉ. विनय काळीकर, विजय पांडे आदी गायकांनी यावेळी गीत सादर केले. राजकपूर यांच्या चित्रपटात मुकेश, मन्नादा, मो. रफी, लतादीदी, आशा भोसले, शारदा यांनी गीते गायिली आहेत. या लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करताना गायकांनी त्यात जीव ओतला. वादकांनी दिलेली योग्य साथ, गीतांचा आशय गायनातून रसिकांपर्यत पोहोचविण्याचा गायकांचा प्रामाणिक प्रयत्न यामुळे कार्यक्रमात प्रत्येक गीताला रसिकांची दाद लाभली. ‘यशोमती मैया से बोले नंदलाला..’ या गीताने प्रारंभ झालेल्या कार्यक्रमात ‘अखियों को रहने दे.., ए भाई जरा देख के...,बरसात मे हमसे मिले..., वो चाँद खिला.., प्यार हुआ इकरार हुआ.., रुक जा ओ जानेवाली..., सजन रे झुठ मत बोलो.., भोर भयी पनघटपे.., ये रात भिगी भिगी...’ आदी गीते सादर करण्यात आली. यावेळी अतिथी गायक डॉ. अजय सूद यांनी ‘ये मेरा प्रेमपत्र..., जाने कहाँ गये वो दिन...’ ही गीते सादर करून रसिकांची दाद घेतली. निवेदन श्वेता शेलगावकर यांचे होते. वाद्यांवर महेंद्र ढोले, रिंकु निखारे, ऋग्वेद पांडे, डॉ. शशिकांत खैरे, रघुनंदन परसटवार, अशोक टोकलवार, सुभाष वानखेडे, उज्ज्वला गोकर्ण यांनी सुरेल साथसंगत केली. ज्येष्ठ गायक कृष्णा भोयर, अकिल अहमद, मधुरिका गडकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अभिनेते राजकपूर यांना स्वरांजली
By admin | Updated: August 25, 2014 01:14 IST