लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुक्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे आढळून आल्याने लग्नकार्य, अंत्यसंस्कार, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा व इतर सर्व प्रकारच्या व्यक्तींच्या एकत्रित येण्याच्या प्रसंगी शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आले होते. यामुळे अनेक लग्नकार्य, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमावर विरजण पडले होते; परंतु त्यानंतर लाॅकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. यामुळे लग्न समारंभ, तेरवी, स्वागत समारंभ, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने नागरिक एकत्र जमू लागले. कोरोनामुळे मागील वर्षी लग्न कार्याची संख्या रोडावली होती; परंतु यावर्षी लग्नकार्य करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात लग्नकार्यात उपस्थित नागरिक कोरोनासंबंधी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे काटेकोरपणे पालन करत नसल्याने कोरोनाचा उद्रेक होण्याची चिन्हे असल्यामुळे लग्न समारंभात ५०, तर अंत्यसंस्काराकरिता २० व्यक्तींना परवानगी दिलेली आहे.
याप्रसंगी उपस्थित सर्व व्यक्तींनी मास्क परिधान करणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. याबाबत नियमाचे पालन होत नसल्यास संबंधित हॉल, लॉन मालकास जबाबदार ठरवून त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्यगृह ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. त्यासंबंधी घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन कटाक्षाने करणे गरजेचे आहे, अशी माहिती प्रभारी तहसीलदार सुजाता गावंडे यांनी दिली.