बेला : काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रादुर्भाव राेखण्यासाठी प्रशासनातर्फे प्रभावी उपाययाेजना केल्या जात आहेत. प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, ग्रामपंचायत बेला व महसूल प्रशासन यांच्या पथकाने विना मास्क फिरणाऱ्या १० व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून १,८०० रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई ७ मार्चपर्यंत सतत सुरू राहणार आहे. यादरम्यान आठवडी बाजार भरणार नाही तसेच शनिवार व रविवारी सर्व व्यवसाय बंद राहतील, याबाबत प्रशासनातर्फे खबरदारी घेतली जात आहे. काेराेना संक्रमण वाढू नये, यासाठी व्यापारी, दुकानदार व गावकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर तालुका कार्यालयाचे तहसीलदार संदीप पुंडकर यांनी केले आहे. या पथकात नायब तहसीलदार अश्विनी नंदेश्वर, मंडळ अधिकारी भुरे, तलाठी संजय गुजर, सचिन पिसुडे, ग्रामविकास अधिकारी कृष्ण बानाबाकाेडे यांच्यासह ग्रा.पं. कर्मचारी, काेतवाल आदींचा सहभाग हाेता.
विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:09 IST