लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - शिक्षण विभागाच्या निर्देशाचे पालन न करता अतिरिक्त शुल्क वसुली करणाऱ्या आणखी तीन शाळांवर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने कारवाई केली आहे. बेसा येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल, जाफरनगर येथील सेंट व्हिन्सेंट पलोटी हायस्कूल व हिवरीनगर येथील सेंट झेव्हियर्स या शाळांचा यात समावेश आहे. या शाळांनी पालकांकडून तीन वर्षांत सुमारे ९ कोटींची अधिकची शुल्क वसुली केल्याचे चौकशीत आढळून आले. महिनाभरात ही रक्कम पालकांना परत करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. परंतु खरोखरच या निर्देशाचे पालन होईल का व इतकी मोठी रक्कम पाहता या शाळा आहेत की अतिरिक्त शुल्क वसुली केंद्र, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
या तीनही शाळांकडून अवास्तव शुल्काची आकारणी होत असल्याच्या तक्रारी पालक तसेच जागरूक पालक समितीने शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे केल्या होत्या. या तक्रारींच्या आधारावर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत चौकशी समिती गठित केली. शाळांकडून प्राप्त झालेल्या कागदपत्रांची तपासणी केली असता, या शाळांनी २०१७-१८ ते २०१९-२० या कालावधीत सुमारे ९ कोटी रुपये अतिरिक्त शुल्क घेतल्याची बाब निदर्शनास आली.
यासंदर्भात सखोल चौकशीनंतर शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांच्याकडून संबंधित निर्देश जारी करण्यात आले. शाळेला पालकांना महिनाभरात अतिरिक्त शुल्क वापस करायचे असून, त्याचा अहवालदेखील शिक्षण उपसंचालक कार्यालयाला सादर करावा लागणार आहे.
कागदपत्रे देण्यास अडचण काय?
शिक्षण उपसंचालक कार्यालयाने याअगोदर दोन सीबीएसई शाळांवर कारवाई केली. आता या तीन शाळांनादेखील धक्का दिला आहे. मात्र या सर्वच शाळांनी २०१३-१४ ते २०१६-१७ या कालावधीतील शुल्कासंदर्भात कागदपत्रे तपासणी पथकाला दिलेली नाहीत. वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील ही कागदपत्रे न दिल्याने पाणी आणखी कुठे मुरते आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही रक्कम निश्चित करण्यासाठी स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार आहे.
प्रत्यक्ष वसुली कधी होणार?
शिक्षण उपसंचालक कार्यालयाने बऱ्याच वर्षांनंतर कारवाई करण्यासाठी पाऊल उचलले आहे. मात्र प्रत्यक्ष वसुली कधी होणार व आताच्या शैक्षणिक सत्रातील शुल्काबाबत काय धोरण असणार, असा प्रश्न पालकांकडून विचारण्यात येत आहे.
असे आहे अतिरिक्त शुल्क
शाळा - शुल्क (रुपयांमध्ये)
पोदार स्कूल, बेसा मार्ग- ४,७७,४९,७२७
सेंट व्हिन्सेंट पलोटी हायस्कूल, जाफरनगर - ३,०१,५१,२९०
सेंट झेव्हियर्स स्कूल, हिवरीनगर - १,१५,४४,३१५