लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांकडून दंडा चलाव मोहीम शिथिल करण्यात आल्यामुळे की काय, बेशिस्त नागरिकांची संख्या दिवसागणिक रस्त्यावर वाढताना दिसून येत आहे. कारण नसताना बगिचात फिरायला निघाल्यासारखे बेशिस्त नागरिक रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत.
विनाकारण घराबाहेर फिरू नका, असे वारंवार आवाहन करूनही बेशिस्त मंडळी त्याला दाद द्यायला तयार नाही. काहीही काम नसताना घरी करमत नाही, असे सांगून बाहेर फिरणारांची संख्या शहरात वाढत आहे. त्यांना कोरोनाची अजिबात भीती नसल्याचे त्यांच्या वर्तनातून दिसून येते, अनेक जण अजूनही मास्क वापरायला किंवा शारीरिक अंतर पाळायला तयार नाहीत. अशा ३४६ बेशिस्त नागरिकांवर पोलिसांनी रविवारी कारवाई केली.
१०६ जणांवर विनामास्कची कारवाई करून ७८०० चा दंड वसुलण्यात आला. विनाकारण गर्दी करणाऱ्या ६१ जणांवर कारवाई करून पोलिसांनी ७४०० रुपये दंड वसूल केला तर लॉकडाऊनचे पालन न करणाऱ्या अन्य १७९ जणांकडून १३ हजारांचा दंड पोलिसांनी वसूल केला.
गेल्या वर्षी पोलिसांनी दंडामार मोहीम राबविल्याने अनेक जण घरात बसत होते. यंदा पोलिसांनी दंड्याऐवजी समुपदेशनाची भाषा वापरणे सुरू केल्याने बेशिस्त मंडळी रस्त्यावर गर्दी करून कोरोनाचा धोका वाढवत आहेत.
---