नागपूर : घटनेच्या वेळी तक्रारकर्ती मुलगी अल्पवयीन होती, हे सिद्ध होऊ न शकल्यामुळे आणि शरीरसंबंधास मुलीची सहमती होती, हे पुराव्यांवरून दिसून आल्यामुळे बलात्कार प्रकरणातील आरोपीला निर्दोष सोडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी दिला.
रामकृष्ण मधुकर वांगेकर (२४) असे आरोपीचे नाव असून तो सारोला मारुती (ता. मोताळा, जि. बुलडाणा) येथील रहिवासी आहे. आरोपीने मे-२०१६ मध्ये संबंधित मुलीवर वारंवार बलात्कार केला. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली, अशी तक्रार होती. सत्र न्यायालयाने आरोपीला कमाल १० वर्षे सश्रम कारावास व एकूण १५००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने संबंधित मुद्दे लक्षात घेता, ते अपील मंजूर करून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला व आरोपीला निर्दोष सोडण्याचा आदेश दिला. आरोपीच्यावतीने ॲड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.