लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : कळमेश्वर-पारडी या पाच किमीच्या रस्त्याने कळमेश्वर शहरासह ती गावे जाेडली आहेत. काही वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात न आल्याने त्याची दैनावस्था झाली असून, त्यावर किरकाेळ अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. याकडे लाेकप्रतिनिधींसह प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आराेप विद्यार्थ्यांसह नागरिकांनी केला असून, तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
कळमेश्वर-पारडी हा रस्ता पारडी, खंडाळा व वलनी या तीन प्रमुख गावांना जाेडला आहे. ही तिन्ही गावे पारडी या गावाचा समावेश नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील असला तरी त्या गावांमधील नागरिकांना आराेग्य व बॅंकिंग सेवेसह आठवडी बाजार व इतर खरेदी, शेतमाल खरेदी-विक्रीसह अन्य कामांसाठी तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कळमेश्वर शहराशी थेट संबंध येताे. हा रस्ता दाेन तालुके व विधानसभा मतदारसंघाला जाेडणारा आहे.
दुरुस्तीअभावी तयार झालेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून पायी चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे एकीकडे अपघात हाेत असून, दुसरीकडे वाहनचालकांना वाहनांचे नुकसान सहन करावे लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आराेप नागरिकांनी केला असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक व विद्यार्थ्यांनी केली आहे.