पेट्रोल चालकांची मनमानी नागपूर : दवाखाने आणि पेट्रोल पंपावर ५०० व १००० रुपयाची जुनी नोट चालणार असल्याचे सुरुवातीपासूच स्पष्ट करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीतही तसे आश्वासन देण्यात आले होते. परंतु पेट्रोल पंप चालकांनी ग्राहकांची चांगलीच लूट केली. ५०० रुपयाची नोट दाखवणाऱ्या ग्राहकाला पूर्ण ५०० रुपयाचे पेट्रोल भरल्यावर नोट चालेल असे स्पष्ट करण्यात आले. एकूणच सध्याच्या परिस्थितीचा फायदा पेट्रोल पंप चालकांनी पुरेपूर घेतला.संविधान चौकातील इंडियन आॅईलच्या पेट्रोल पंपावर एक दोन लिटर पेट्रोल भरणाऱ्यांकडून १०० रुपयांची नोट मागण्यात आली. ज्यांच्याकडे ५०० रुपयाची नोट असेल त्यांना पूर्ण रुपयाचे पेट्रोल भरण्याची सक्ती करण्यात येत होती. एखाद दुसऱ्या ग्राहकाने कंपनीच्या पेट्रोल पंपावर ५०० व १००० रुपयाची नोट चालत असल्याचे लक्षात आणून दिले तेव्हा आम्ही कुठे नोट चालत नाही, असे म्हणतो. परंतु आमच्याकडे सुटे पैसेच नाही तर देणार कुठून असे कारण सांगितले जात होते. हीच परिस्थिती झाशी राणी चौकातील पेट्रोल पंपावर पाहायला मिळाली. तिथे ५०० रुपयाची नोट चालत नाही, असे स्पष्टच सांगितले जात होते. पुढे पंचशील टॉकीजसमोरील पेट्रोल पंपावरील परिस्थिती थोडी चांगली होती. तिथे ५०० रुपयाची नोट दाखवणाऱ्यास किमान ४०० रुपयाचे पेट्रोल भरण्यास सांगितले जात होते. सर्वच ठिकाणी सुटे पैसे नसल्याचे कारण सांगितले गेले. (प्रतिनिधी)टंकीची क्षमताच नाही तरी पेट्रोल भरण्याची सक्ती नरेंद्रनगर पुलाजवळील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले होतो. ५०० ची नोट होती. तेव्हा पेट्रोल पंप चालकाने मला पूर्ण रुपयाचे पेट्रोल भरणार असाल तरच नोट चालेल असे सांगितले. माझ्या दुचाकीत ५०० रुपयाचे पेट्रोल येत नाही. साडेतीन लिटरची माझ्या दुचाकीची पेट्रोल टंकी आहे. ही अडचण सांगितली तेव्हा त्याने मला गाडीत जितके पेट्रोल येते तितके भरा आणि उर्वरित पेट्रोल बाटलीत घेऊन जा, असे सांगितले. परंतु पूर्ण ५०० रुपयाचे पेट्रोल भराल तरच ही नोट चालेल असे स्पष्ट केले. - निळू भगत
५०० चे पेट्रोल भरा, तरच नोट स्वीकारू
By admin | Updated: November 11, 2016 02:48 IST