नागपूर : अंतिम वर्षाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल लागलेले नसताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेची सूचना काढली आहे. निकाल उशिरा लागणार असल्यामुळे साहजिकच प्रवेश उशिरा होतील व पर्यायाने वर्गदेखील उशिरा सुरू होतील. यामुळे ‘अॅकेडॅमिक कॅलेंडर’ कसे पाळले जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, अवघ्या २० महाविद्यालयांमुळे ‘बीएस्सी’च्या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली आहे.अनेक महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण विद्यापीठाला पाठविलेलेच नाही. त्यामुळे अंतिम वर्षाचे निकाल अद्याप लागलेले नाहीत. याबाबत कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आणखी काही बाबी स्पष्ट केल्या. ‘बीएस्सी’च्या २० महाविद्यालयांनी हे गुण पाठविलेले नाही. त्यामुळे हे निकाल प्रलंबित होते. परंतु केवळ २० महाविद्यालयांसाठी सर्व विद्यार्थ्यांचे निकाल रोखू नका, असे स्पष्ट निर्देश परीक्षा विभागाला देण्यात आले आहेत. संबंधित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे निकाल मात्र रोखण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. कला व वाणिज्य शाखेच्या निकालाची ‘स्क्रूटिनी’ राहिली होती. परंतु ती आता झाली असून लवकरात लवकर निकाल लावण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, बुधवारी विद्यापीठाने विविध विभागांमधील ४७ अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेची सूचना अधिकृतपणे जाहीर केली. परंतु अंतिम वर्षाचे निकालच लागले नसल्याने हे प्रवेश कधी होतील, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. ‘अॅकेडॅमिक कॅलेंडर’नुसार विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र १५ जूनपासूनच सुरू होणे अपेक्षित होते. परंतु अद्याप निकालच लागले नसल्याने पुढील वर्ग सुरू झालेलेच नाही. अशास्थितीत ‘अॅकेडॅमिक कॅलेंडर’ यंदा तरी तंतोतंत पाळल्या जाणार नाही, हे निश्चित झाले आहे. (प्रतिनिधी)
विद्यापीठाचे ‘अॅकेडॅमिक कॅलेंडर’ संकटात
By admin | Updated: June 25, 2015 03:02 IST