आरी चालविण्यापूर्वी होणार संयुक्त सर्वेक्षण : महाराजबाग ते विद्यापीठ ग्रंथालय रोडचे प्रकरणस्वप्नील पवार नागपूरमहाराजबाग चौक ते नागपूर विद्यापीठ ग्रंथालय चौक या रोडच्या रुंदीकरणासाठी ९२ झाडांना टार्गेट करण्यात आले आहे. यापैकी अनेक झाडे भव्य आकाराची आहेत. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी या रोडवरील झाडे कापण्यास विरोध होत आहे.सध्या हा रोड १२ मीटर रुंद व ६८० मीटर लांब आहे. रोडची रुंदी वाढवून २४ मीटर करण्यात येणार आहे. अधीक्षक अभियंत्यांकडून यासंदर्भात प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने वर्तमानपत्रात जाहिरात प्रकाशित करून रोडवरील ९२ झाडे कापण्यावर नागरिक व संघटनांकडून सूचना व आक्षेप मागवले होते. त्यानुसार ग्रीन व्हिजिल संस्थेचे कौस्तुभ चॅटर्जी यांनी आक्षेप सादर केले आहेत. त्यांच्या आक्षेपांवर बुधवारी सुनावणी झाल्यानंतर ९२ झाडांचे संयुक्त सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनपाच्या वृक्षसंवर्धन समितीचे प्रतिनिधी, कार्यकारी अभियंता व ग्रीन व्हिजिल संस्थेचे प्रतिनिधी मिळून गुरुवारी सर्वेक्षण करणार आहेत. यातून जास्तीतजास्त झाडे वाचविण्यासाठी उपाय शोधण्यात येणार आहे.‘ट्री अॅथॉरिटी नियम-१९७५’अनुसार झाडे कापण्यासाठी स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य आहे. वृक्ष संरक्षण समितीने हिरवी झेंडी दाखविल्यानंतर धंतोली झोनतर्फे नवीन झाडे लावण्याची हमी व आवश्यक शुल्कासह उद्यान विभागाकडे झाडे कापण्यासाठी अर्ज सादर करण्यात येईल. या २४ मीटर रुंद रोडवर दोन्ही बाजूने १ मीटर रुंद सांडपाणी वाहिनी व २ मीटर रुंद फुटपाथ राहणार आहे. कृषी विद्यालयापुढील उद्यानाचा अर्धा भाग रोड रुंदीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)
रोड रुंदीकरणासाठी ९२ झाडे टार्गेट
By admin | Updated: November 19, 2015 03:36 IST