नागपूर : निर्माणाधीन रामझुल्यासाठी (रेल्वे ओव्हरब्रिज) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला नागपूर महापालिकेतर्फे नऊ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे आता रामझुल्याचे काम अधिक गतीने पूर्ण होण्याची शक्यता बळावली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता समय निकोसे यांनी निधी मिळाल्याबाबत दुजोरा दिला आहे. लोकमतशी बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या शुक्रवारी महापालिकेकडून नऊ कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याने आता निधीची कुठलीही अडचण नाही. रामझुल्याचे काम जोमाने सुरू राहील. ‘रेल्वे ब्लॉक’साठी सुद्धा मध्य रेल्वे प्रशासनाने आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे रामझुल्याच्या पहिल्या चरणांतर्गत ‘थ्री लेन’चे काम सप्टेंबरच्या शेवटपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. रामझुल्याच्या सुरुवातीचा खर्च ६० कोटी रुपये होता. १५ कोटी रुपयांचे काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदार एफ्कॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने खर्चाची रक्कम वाढविण्याची मागणी करीत काम थांबविले होते. ती मागणी मंजूर करण्यात आली. त्यानुसार रामझुल्याच्या उर्वरित कामासाठी ५४ कोटी रुपये देण्याचे निश्चित झाले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे एफ्कॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर रामझुल्याचे काम करीत आहे. २५ जानेवारी २००६ रोजी रामझुल्याचे वर्क आॅर्डर निघाले होते. दोन वर्षांत पूल बनणार होता, परंतु तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
रामझुल्यासाठी मिळाले नऊ कोटी
By admin | Updated: July 22, 2014 00:51 IST