नागपूर विद्यापीठ : संलग्नीकरण रद्द, विद्यार्थ्यांना प्रवेश न घेण्याची सूचना नागपूर : एकेकाळी महाविद्यालयांना संलग्नीकरणाची खैरात वाटणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने निष्क्रिय महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या व विद्यापीठाशी कुठलाही संपर्क न ठेवणाऱ्या ७१ महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द करण्यात आले आहे. या महाविद्यालयांमध्ये पुढील सत्रापासून प्रवेशबंदी करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी येथे प्रवेश न घेण्याची सूचना विद्यापीठातर्फे करण्यात आली आहे. यामुळे आता विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयांची संख्या घटली आहे. एकही नियमित प्राध्यापक नसल्याच्या मुद्यावरून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दोन वर्षांअगोदर २५० महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावली होती. यातील ७१ महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या अटींचे पालन केलेले नसल्याचे लक्षात येताच त्यांचे संलग्नीकरण काढण्याचा इशारा नागपूर विद्यापीठाने एप्रिल महिन्यात दिला होता. या महाविद्यालयांनी एकाही नियमित प्राध्यापकाची नियुक्ती केली नव्हती. अनेक वर्षांपासून येथे विद्यार्थ्यांचे प्रवेशदेखील होत नव्हते. शिवाय या महाविद्यालयांनी संलग्नीकरणाचे नूतनीकरणदेखील केले नव्हते. याबाबत विद्यापीठाने अनेकदा पत्रव्यवहार केला. महाविद्यालयांच्या अशा भूमिकेमुळे त्यांचे संलग्नीकरण विद्यापीठाच्या हितसंबंधांना तसेच शैक्षणिक दर्जास बाधा पोहोचविणारे आहे. त्यामुळे ते रद्द का करण्यात येऊ नये असा प्रश्न ‘बीसीयूडी’ संचालक डॉ.डी.के.अग्रवाल यांनी उपस्थित केला होता व त्यांनी या महाविद्यालयांना नोटीसदेखील बजावली होती. मात्र, या महाविद्यालयांकडून उत्तर आलेले नाही. त्यामुळे ‘बीसीयूडी’च्या वतीने तीनदा पत्र देण्यात आले होते. मात्र तरीही प्रतिसाद मिळत नसल्याने बीसीयूडी संचालक डॉ. अग्रवाल यांनी अशी बोगस महाविद्यालये बंद करण्याचा प्रस्ताव विद्वत् परिषदेत ठेवला. जुलै महिन्यात या महाविद्यालयांना बंद करण्याचा निर्णय विद्वत् परिषदेने घेतला. त्यानुसार संलग्नीकरण रद्द करण्याची कारवाई करण्यात आली.(प्रतिनिधी)
७१ महाविद्यालयांत प्रवेशबंदी
By admin | Updated: December 22, 2016 02:35 IST