नागपूर : जिल्ह्यातील आठही आगारामिळून शनिवार आणि रविवार या दोन दिवसात एसटी महामंडळाला फक्त ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ‘ब्रेक द चेन’ प्रक्रियेत २२ लाख रुपयांवर आले होते, ते या दोन दिवसात चांगलेच खालावले आहे.
नागपूर विभागामध्ये असलेल्या काटोल, सावनेर, रामटेक, उमरेड या चार ग्रामीणमधील आगारांसह नागपूर शहरात चार असे एकूण आठ आगार आहेत. गणेशपेठ आगार सर्वात मोठे आहे. येथे नियमित १,१५० ते १,२०० फेऱ्या असतात. मात्र शनिवारी ३६५ व रविवारी २६७ फेऱ्या सोडण्यात आल्या. आगारात ८० बसेस असल्या तरी फक्त २५ बसेस या दोन दिवसात धावल्या. यामुळे उत्पन्नात मोठी घट झाल्याचे आगार व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
नागपूर विभागात ४५० बसेस असल्या तरी ‘ब्रेक द चेन’ काळात २०० बसेस चालविल्या जात होत्या. या दोन दिवसात ६० ते ७० बसेस जिल्ह्यात धावल्या. नियमित फेऱ्या एक लाख ६० हजार किलोमीटर असायच्या. ब्रेक द चेन काळात ८० हजार किलोमीटर आणि या दोन दिवसात २० हजार किलोमीटरवर प्रवास आला.
...
नागपूर जिल्ह्यातील आठ आगारातील एकूण बसेस : ४५०
दोन दिवसात धावलेल्या बसेस : ६० ते ७०
सर्व आगारांमधील फेऱ्या : २४०
दोन दिवसात मिळालेले उत्पन्न : ४ ते ५ लाख
...
बॉक्स
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर
नागपूर विभागातील आठही आगार मिळून २,७५० कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी दोन हजारांच्या संख्येतील वाहक आणि चालकांची सेवा अत्यावश्यक श्रेणीत येते, तर अन्य श्रेणीतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के ठेवण्यात आली होती. बसेसच्या फेऱ्या घटल्याने या दोन दिवसात वाहक आणि चालकांनाही गरजेनुसार कामावर बोलावण्यात आले होते.
...
कोट
विभागात महामंडळाला दोन दिवसात मोठे नुकसान झाले. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन फेऱ्या सोडण्यात आल्या. सोमवारी पूर्ण क्षमतेने वाहतूक राहील. लॉकडाऊन जाहीर झाल्यास शासनाच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल.
- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर
...
बॉक्स
दोन दिवसात १५ लाखांचा तोटा
- शनिवार आणि रविवार या दोन दिवसात नागपूर आगाराला १५ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. अलीकडच्या काळात २२ लाख रुपयांचे उत्पन्न दररोज असायचे, ते या दोन दिवसात फक्त ४ ते ५ लाख रुपयांवर आले.
- या दोन दिवसात ८० टक्के प्रवासी सेवा बंद करावी लागली होती. लांब पल्ल्यांच्या बसेसही कमी कराव्या लागल्या. या फेऱ्यांना प्रवाशी अगदी कमी असल्याचे लक्षात आल्यावर हा निर्णय घेण्यात आला. शनिवारच्या अनुभवानंतर रविवारी फेऱ्यांच्या संख्येत घट करण्यात आली.
...