ब्रिजेश तिवारी
कोंढाळी: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत काटोल व नरखेड तालुक्यातील १०,२७५ शेतकऱ्यांना ८५ कोटी ४७ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. पण या कर्जमाफीपासून दोन्ही तालुक्यातील ६९३ शेतकरी वंचित आहे. यातील १८५ शेतकऱ्यांचे अद्यापही आधार कार्ड प्रमाणिकरण झालेले नाही.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने २०१९ मध्ये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची दोन लाख रुपयापर्यंत थकीत कर्ज माफीची घोषणा केली. यासाठी काटोल तालुक्यातील ५३७६ व नरखेड तालुक्यातील ५६६९ अशा एकूण ११०४५ शेतकऱ्यांची बँकांनी निवड केली. या अंतर्गत काटोल तालुक्यातील ५३६६ व नरखेड तालुक्यातील ५६०२ अशा एकूण १०,९६८ शेतकऱ्यांचे आधार कार्ड प्रमाणिकरण करून त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आले. यानंतर काटोल तालुक्यातील ४८६४ शेतकऱ्यांना ४१ कोटी ५८ लाख रुपये तर नरखेड तालुक्यातील ५४११ शेतकऱ्यांना ४३ कोटी ८९ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. काटोल तालुक्यातील ५०२ व नरखेड तालुक्यातील १९१ शेतकरी अद्यापही यापासून वंचित आहे. यातील १८५ शेतकऱ्यांना वारंवार सूचना देऊनही आधार प्रमाणिकरण झाले नाही. यातील काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले नाही त्यांनी ही प्रक्रिया करुन घ्यावी असे आवाहन काटोलचे सहायक निबंधक सहकारी संस्था अविनाश इंगळे यांनी केले आहे. काटोल तालुक्यातील १४ व नरखेड तालुक्यातील ३ असे १७ कर्जमाफी प्रकरण तालुका समितीकडे प्रलंबित आहे. यासोबतच जिल्हा समितीकडे या दोन्ही तालुक्यातील ३५ प्रकरणे प्रलंबित आहेत.