लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील शहरांमधील पायाभूत सुविधांचा विकास व्हावा यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक सेवा बळकटीकरणावर भर देण्यात आला आहे. ‘नागपूर मेट्रो’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५ हजार ९७६ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, तर ‘नाशिक मेट्रो’साठी २ हजार ९२ कोटींची तरतूद केली आहे.
सार्वजनिक वाहतूक प्रणालीअंतर्गत ‘मेट्रो’च्या विस्तारावर भर देण्यात आला आहे. देशात सद्यस्थितीत ७०२ किलोमीटर लांबीची ‘मेट्रो’सेवा सुरू आहे. २७ शहरांमध्ये १ हजार १६ किलोमीटरचे ‘मेट्रो’चे बांधकाम सुरू आहे. ‘टू-टायर’ शहरांमध्ये तसेच ‘टायर-१’ शहरांच्या बाहेरील भागांसाठी ‘मेट्रोलाईट’ व ‘मेट्रोनिओ’ प्रणाली सुरू करण्यात येईल.
‘मेट्रो’साठी अशी आहे तरतूद...
-‘कोची मेट्रो रेल्वे’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी (११.५ कि.मी.) १९५७.०५ कोटी
-‘चेन्नई मेट्रो रेल्वे’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी (११८.९ कि.मी.) ६३,२४६ कोटी
- ‘बंगळुरू मेट्रो रेल्वे’ प्रकल्पाच्या ‘टू-ए’ व ‘टू-बी’ प्रकल्पासाठी (५८.१९ कि.मी.) १४,७८८ कोटी
शहर बससेवांसाठी १८ हजार कोटींची योजना
सोबतच शहर बससेवादेखील विकसित करण्यात येणार आहे. यासाठी १८ हजार कोटींची नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. यासाठी ‘पीपीपी मॉडेल’ अवलंबण्यात येईल. त्यामुळे २ हजारांहून अधिक बसेससाठी वित्तपुरवठा, सेवा संपादित करणे, संचलन करणे व देखभालीसाठी खासगी क्षेत्राला परवानगी देण्यात येईल.