बंदचा परिणाम : दिवसभरात ५० लाखाचा फटकानागपूर : कर्मचाऱ्यांना अतिशय तोकडे वेतन असल्यामुळे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस(इंटक)च्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदमुळे गुरुवारी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील ५५० बसेसपैकी एकही बस आगाराबाहेर पडली नाही. दिवसभर सुरू असलेल्या या संपामुळे महामंडळाच्या नागपूर विभागाला तब्बल ५० लाखाचा फटका बसला. दरम्यान, मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय हा संप मागे घेण्यात येणार नसल्याचा पावित्रा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस(इंटक)ने घेतला आहे.महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस(इंटक)च्या वतीने २०१२-२०१६ चा कामगार करार रद्द करून २५ टक्के वेतनवाढ करण्याची मागणी केली होती. १७ डिसेंबरला संप पुकारण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी महिनाभरापूर्वी दिला होता. परंतु महामंडळाच्या वतीने त्यावर काहीच निर्णय न घेतल्यामुळे संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एसटी बसेस आगाराबाहेर पडू दिल्या नाहीत. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात एकूण आठ आगार आहेत. या आठ आगारात एकूण ५५० बसेस आहेत. संपामुळे या बसेसपैकी एकही बस आगाराबाहेर पडली नाही. त्यामुळे नागपूर विभागाला तब्बल ५० लाखाचा फटका बसला आहे. महामंडळाच्या नागपूर विभागात एकूण ११२५ चालक, ११६४ वाहक, ५८९ मेकॅनिकल आणि २८० कार्यालयीन कर्मचारी आहेत. संपामुळे हे सर्व कर्मचारी दिवसभर महामंडळाच्या आगारात रिकामे बसून होते. सायंकाळपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर कुठलाच तोडगा न निघाल्यामुळे महामंडळाची एकही बस रस्त्यावर उतरली नाही. नागपूर विभागात एकूण ३०२६ फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळास घ्यावा लागला. (प्रतिनिधी)
५५० बसेसची चाके थांबली
By admin | Updated: December 18, 2015 03:19 IST