नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार (सुपर स्पेशालिटी) रुग्णालयात २०१२ रोजी घेण्यात आलेली डबल बलून एन्डोस्कोपीच्या ५१ कोटी ४८ हजाराच्या मशीनवर एकही चाचणी झालेली नाही, असा आरोप एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केला असून त्यावर सात दिवसांत गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागाला माहिती सादर करण्याचे निर्देश अपिलीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ता मंगेश गाकरे यांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात असलेल्या डबल बलून एन्डोस्कोपी मशीनवर झालेल्या चाचण्यांची माहिती अधिकारात माहिती मागितली होती. यात २०१२ मध्ये १२, २०१३ मध्ये पाच, २०१४ मध्ये १७ तर २८ एप्रिल २०१५ पर्यंत नऊ रुग्णांवर डबल बलून एन्डोस्कोपी चाचणी झाल्याची माहिती देण्यात आली. परंतु गाकरे यांना यापूर्वीच्या माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीमध्ये रुग्णालयाच्या अभिलेखागार विभागाने गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागाकडून माहिती उपलब्ध झाली नसल्याचे सांगण्यात आले होते. गाकरे यांचे समाधान न झाल्याने त्यांनी अपिलीय अधिकाऱ्याकडे दाद मागितली. त्यानुसार गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागाला सात दिवसांत या मशीनवर चाचणी झालेल्या रुग्णांचे नाव, वय, पत्ता, रुग्णांचा नोंदणी क्रमांक, भरती केल्याची व सुटीची तारीख कळविण्याचे निर्देश अपिलीय अधिकाऱ्याने दिले आहेत.(प्रतिनिधी)
५१ कोटींची मशीन धूळखात
By admin | Updated: October 6, 2015 03:38 IST