नागपूर : व्यावसायिक नवनीतसिंग तुली यांनी माजी राज्यमंत्री अनिस अहमद व इतरांविरुद्ध दिवाणी न्यायालयामध्ये ४ कोटी ९५ लाख ६९ हजार ८८३ रुपयाचा दावा दाखल केला आहे. त्यात अहमद व इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्यात आली आहे. दाव्यावर ८ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
अहमद हे मेहबुबा शिक्षण व महिला ग्राम विकास बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी आहेत. या संस्थेद्वारे सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी व सेंट्रल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निक ही दोन महाविद्यालये संचालित केली जात आहेत. अहमद यांनी ही दोन्ही महाविद्यालये तुली यांना पाच कोटी रुपयामध्ये विकण्याची तयारी दाखविली होती. त्यामुळे तुली यांनी अहमद यांना वेळोवेळी ४ कोटी ३३ लाख ६९ हजार ८८३ रुपये दिले. त्याचे पुरावे तुली यांच्याकडे उपलब्ध आहेत. दरम्यान, अहमद यांनी तुली यांना महाविद्यालयांचा ताबा देण्यास नकार दिला. तसेच, तुली यांना त्यांची रक्कमही परत केली नाही. परिणामी, तुली यांनी हा दावा दाखल केला आहे. तुली यांच्यातर्फे ॲड. रवींद्र राजकारणे यांनी कामकाज पाहिले.