नागपूर : गेल्या वर्षभरापासून कोरोना प्रादुर्भावामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र वीजसेवा देणाऱ्या महावितरणच्या ३५,६०० (४७ टक्के) नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
महावितरणच्या ७५ हजार कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत ३५,६०० कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये महावितरणचे ६,५६२ कर्मचारी कोरोनाबाधित झाले असून, त्यापैकी ४,१३२ कोरोनामुक्त झाले आहे. सध्या २,२२१ कर्मचारी कोरोनाबाधित असून, त्यांच्यावर रुग्णालय व घरी उपचार सुरू आहेत.
राज्यातील २ कोटी ८० लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालये, विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन निर्मिती उद्योग व लसीकरण केंद्रांना नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार देण्यासाठी प्रशासकीय सोपस्कार बाजूला ठेवून युद्धपातळीवर कामे करण्यात येत आहे. राज्यात सद्य:स्थितीत अतिरिक्त १० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसह ३९ कोविड रुग्णालयांना २४ तासांमध्ये नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणने केली आहे.