आर्थिक हातभार : स्टॅम्प ड्युटीतून एलबीटीची वसुली कायमनागपूर : ५० कोटीपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटीतून वगळण्यात आले आहे. काही प्रमाणात एलबीटी हटविल्याच्या मोबदल्यात महापालिकेला राज्य सरकारकडून दर महिन्याला अनुदान स्वरुपात ४४ कोटी मिळण्याची आशा आहे. सोबतच मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून एक टक्का एलबीटी कायम राहणार आहे. यातून पाच कोटी व तसेच ५० कोटीहून अधिक व्यापार असलेल्या व्यापाऱ्यांकडून ७ कोटी व ४४ कोटी असे महिन्याला ५६ कोटीचे उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. मागील पाच वर्षात जकात व एलबीटीच्या माध्यमातून ज्या वर्षात सर्वाधिक उत्पन्न झाले. ते गृहीत धरून सरकारकडून त्या आधारावर अनुदान मिळणार आहे. २०१२-१३ या वर्षात जकातीपासून सर्वाधिक ४८५ कोटीचे उत्पन्न झाले होते. यात ८ टक्के वाढ गृहीत धरता ५२४ कोटी होतात. या आधारे मनपाला दर महिन्याला ४४ कोटी अनुदान मिळण्याची आशा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरेसे अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी ते पूर्ण केल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिली. विधानसभेत पाच महिन्यासाठी २०४०. ४४ कोटीच्या अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. ही रक्कम २५ महापालिकांना अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे. मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून गेल्या वर्षात मनपाला ६० कोटीचे उत्पन्न झाले होते. त्यावरील एलबीटी कायम असल्याने महिन्याला पाच कोटी मिळतील. जकातीच्या आधारे अनुदान मिळणार असल्याने मनपाची र्आिर्थक स्थिती चांगली होईल. असा विश्वास सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला. यातून एलबीटीचे नुकसान भरून निघणार असल्याने तिवारी व सिंगारे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. अभय योजनेची मुदत १५ दिवसांनी वाढविण्यात आली आहे. त्यानंतर एलबीटी रिटर्न न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल. परंतु या संदर्भात मनपाला सरकारच्या निर्देशाची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)
मनपाला मिळणार ४४ कोटीचे अनुदान
By admin | Updated: August 2, 2015 03:13 IST