वाळू माफिया दहशतीत : आठ दिवसात तिसरी मोठी कारवाई नागपूर : वाळू माफियांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. शहर व ग्रामीण भागात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत सोमवारी पुन्हा एकदा अवैध रेतीचे ४२ ट्रक पकडण्यात आले. यात शहरात सर्वाधिक २८, तर महालगाव कापसी येथे ११ आणि पारशिवनी येथे तीन ट्रक पकडण्यात आले. आठवडाभरातील ही तिसरी मोठी कारवाई आहे. महसूल विभाग, परिवहन विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये दहशत पसरली आहे जिल्ह्यातील रेतीघाटावरून वाळू चोरीचे प्रमाण खूप वाढले आहेत. वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी वेळोवेळी उपाययोजनाही करण्यात आल्यात. परंतु त्याचा फारसा फायदा झाला नाही. वाळूमाफियांची दादागिरी मोडीत काढण्यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दंड थोपटले आहेत. त्यांनी १ जुलैपासून जिल्ह्यात अवैध गौण खनिजविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे.या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी तब्बल १२९ ट्रक पकडण्यात आले होते. त्यानंतर ४ तारखेला चनकापूर खापरखेडा येथे ९२ ब्रास रेती जप्त करण्यात आली. त्याच दिवशी रोहना येथे तीन ट्रक पकडण्यात आले होते. तर सोमवारी नागपूर शहरात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या २८ ट्रकवर कारवाई करून २ लाख ४५ हजार ४५० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. यानंतर भंडारा रोडवरील महालगाव कापसी येथे प्रमाणापेक्षा जास्त वाळू घेऊन जाणाऱ्या ११ ट्रकवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर पारशिवणी तालुक्यात तीन ट्रकवर कारवाई करीत २० हजार २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याशिवाय भिवापूर तालुक्यातील मौजा चारगाव येथे २१६ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध सुरू असलेल्या सलग कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. तर दुसरीकडे ही कारवाई अशीच सुरू राहील, असे जिल्हाधिकारी कुर्वे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)गेल्यावर्षी २५४३ प्रकरणांची नोंद जिल्हा प्रशासनातर्फे २०१४ मध्ये राबविण्यात आलेल्या अवैध गौण खनिज मोहिमेंतर्गत २५४३ प्रकरणे पकडण्यात आली होती. तसेच त्यांच्याविरुद्ध कारवाई करून २ कोटी २१ लाख रुपयाचा दंडही ठोठावण्यात आला होता. यात मुरुम व गिट्टीची दोन चार प्रकरणे सोडली तर उर्वरित सर्व प्रकरणे ही अवैध वाळूची होती. या वर्षी एप्रिल-मे आणि जून या तीन महिन्यात व ५ जुलैपर्यंत राबविण्यात आलेल्या मोहिमे अंतर्गत ३१४ प्रकरणे पकडण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध कारवाई करून ४९,९६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अवैध रेतीचे ४२ ट्रक पकडले
By admin | Updated: July 7, 2015 02:21 IST