सुमेध वाघमारे नागपूरशासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (मेडिकल) ६३ वर्षांपूर्वीच्या विद्युत यंत्रणेद्वारेच आजही वीजपुरवठा सुरू आहे. परिणामी विद्युत दाब खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. धक्कादायक म्हणजे, पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून घेण्यात आलेली ४० कोटींची अद्ययावत उपकरणे धोक्यात आली आहेत. याचा पहिला फटका रेडिओलॉजी विभागातील एमआरआय व डिजिटल एक्स-रे मशीनला बसला आहे. मध्य भारतातील सर्वात मोठ्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या विद्युतीकरणाची स्थिती गंभीर आहे. शॉट सर्किट होऊन वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे रुग्णांना अंधारात राहावे लागेत. अनेकदा तर महत्त्वाच्या शस्त्रक्रियाही थांबविण्यात येतात. मेडिकलमध्ये गेल्या ६३ वर्षांत वॉर्डांची संख्या वाढली, विभाग वाढले, शस्त्रक्रियागृहे वाढली आणि मुख्य म्हणजे वातानुकूलित यंत्र व इतरही मोठमोठी यंत्रसामग्री वाढली, मात्र वीजपुरवठा करणारी प्रणाली बदलविण्यात आली नाही. विशेष म्हणजे, मेडिकलच्या विद्युतीकरण नवीनीकरणासाठी २०१० मध्ये १ कोटी ८० लाख ९४ हजार ४५२ रुपयांच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली; मात्र अद्यापही निधी उपलब्ध झालेला नाही.मेडिकलच्या प्रत्येक विभागातील महत्त्वाची यंत्रसामग्री, शल्यक्रियागृह, एमआरआय यंत्र, सीटी स्कॅन, एक्स-रे मशीन वारंवार बंद पडतात. याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. सद्यस्थितीत मेडिकलच्या वॉर्ड क्र. ४, ६,७, ८, ९,१०, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, १८, १९, २०, २१, २३, २५, २६, २७, ३०, ३२, ३३, ३४, ३५, आणि ३६ आदी वॉर्डातील विद्युत व्यवस्था निकामी झाल्यासारखीच आहे.
ंमेडिकलमधील ४० कोटींची उपकरणे धोक्यात
By admin | Updated: May 4, 2015 02:24 IST