लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने सलग दोन दिवस कारवाई करून ३९१ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. पकडलेल्या आरोपींचा पोलिसांनी पाच दिवसाचा पीसीआर मिळविला आहे.
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी फुलसिंग ऊर्फ सोनू सोहन सिंग पट्टी, प्रशांत विश्वासराव सुटे, आसिफ सियासत अली अन्सारी आणि अजहर मजहर पटेल या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २५६ ग्रॅम एमडी जप्त केली. तर रविवारी मोहम्मद आवेश मोहम्मद शफी शेख याच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून १३५ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आले.
मुंबईचा ड्रग सप्लायर आमिर खान अतिक खान याच्याकडून उपरोक्त आरोपी एमडी विकत घेत होते. ते नागपूरसह आजूबाजूच्या शहरातही विकत होते. पोलिसांच्या कारवाईत अडकू नये म्हणून आरोपी कुरियरने एमडी बोलवत होते. त्याची कुणकुण लागताच गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला आणि मोठ्या शिताफीने कारवाई करून पहिल्या दिवशी आरोपी सोनू सोहन सिंग पट्टी, प्रशांत विश्वासराव सुटे, आसिफ सियासत अली अन्सारी आणि अजहर मजहर पटेल या चौघांना पकडले. त्यांच्याकडून २५६ ग्रॅम एमडी तर रविवारी मोहम्मद आवेश मोहम्मद शफी याला १३५ ग्रॅम एमडीसह अटक केली. त्याच्याकडून मोबाईल, दुचाकी आणि एमडी पावडर असा एकूण सहा लाख ४५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आधींच्या चार आरोपींचा ३ डिसेंबरपर्यंत पीसीआर आहे. तर आवेशला आज न्यायालयात हजर करून त्याचा ४ डिसेंबरपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, एपीआय बयाजीराव कुरळे, सूरज सुरोशे, पीएसआय देवीदास बांगडे, हवालदार राजेश देशमुख, प्रदीप पवार, समाधान गीते, नामदेव टेकाम, विनोद गायकवाड, नितीन मिश्रा, शिपाई अश्विन मांगे, समीर शेख, नितीन साळुंखे, राहुल पाटील, रुबीना शेख आणि पूनम रामटेके यांनी बजावली.
---
आमिर खान फरार
पोलिसांकडून शोधाशोध
नागपूरसह ठिकठिकाणी एमडी तस्करीचे नेटवर्क उभा करणारा मुंबईचा कुख्यात आमिर खान या दोन्ही गुन्ह्यात आरोपी असून, तो फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी धावपळ चालविलेली आहे.