नागपूर : सुगतनगर आरमोरस टॉवर परिसरात हायटेन्शन लाईन भूमिगत करण्याचे काम सुरू आहे. नियमानुसार हे काम होत नसल्याचे दिसते आहे. चार फूट खड्याच्या जागी दोन फूट खड्डा खोदून ३३ केव्हीची लाईन टाकण्यात येत आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी युवा सेनेचे गणेश सोलंके यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली आहे.
विशेष म्हणजे काही वर्षापूर्वी उत्तर नागपुरातील सुगतनगर येथील आरमोरस टॉवर येथून जाणाऱ्या हायटेन्शन लाईनच्या तारेला स्पर्श झाल्याने दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हायटेन्शन लाईनखालील घरे तोडण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले होते. पण ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुढाकाराने घरे न पाडता हायटेन्शन लाईन भूमिगत करण्याला मंजुरी मिळाली. मानकापूर ते उप्पलवाडी दरम्यान लाईन भूमिगत करण्याचे काम सुरू आहे. यात ३३ केव्हीचा केबल टाकण्यात येत आहे. नियमानुसार ४ फुटाचा खड्डा खोदून त्यात हाफ राऊंड टाकून, त्यावर ४ इंच रेती टाकून खड्डा बुजविण्यात यायला हवा. पण दोन ते अडीच फूट खड्ड्यात केबल पुरण्यात येत आहे. त्यात रेतीसुद्धा टाकण्यात येत नाही. या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे.