स्मार्ट सिटीच्या नावाखाली शिर्षस्थ अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती देतो, अशी बतावणी करून एका आरोपीने एकाला ३० लाख रुपयांचा गंडा घातला. प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर आरोपी गिरीश वाढवेकर ( वय ४०, रा. प्रीतीभोज अपार्टमेंट, तात्या टोपे हॉलसमोर, सुरेंद्रनगर) हा फरार झाला. आरोपी वाढवेकरांकडून गंडविल्या गेलेल्या फिर्यादीचे नाव सुरेश टिकमलाल राऊत (वय ५२) आहे. ते बजाजनगरात राहतात. राऊत स्वत: आयटी इंजिनिअर आहेत. त्यांनी अनेक मोठ्या गृह आणि अन्य प्रकल्पाचे काम हाताळले आहे. आरोपी गिरीश वाढवेकर हासुद्धा आयटी इंजिनिअर असून, ठगबाज आहे. गेल्या वर्षी एका प्रकल्पनिर्मितीच्या निमित्ताने वाढवेकरचा सुरेश राऊत यांच्याशी संपर्क आला.राऊत यांच्याकडून मोठी रोकड उकळता येऊ शकते, याची कल्पना आल्याने आरोपी वाढवेकर याने त्यांना थेट नागपूरच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदी नियुक्ती करून देतो, अशी बतावणी केली. एवढ्या मोठ्या पदावर नियुक्ती मिळणार म्हणून, राऊतही आनंदले. या पदासाठी ३० लाख रुपये द्यावे लागतील, अशी वाढवेकरने अट ठेवली, ती मान्य करून १४ जुलै २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत त्यांनी दोन टप्प्यात ३० लाखांची रोकड वाढवेकरला दिली. त्या बदल्यात राऊत यांना विविध विभागातील वरिष्ठांच्या नावाने ई-मेल आणि अधिकाऱ्यांची पत्र मिळाली. प्रत्यक्षात नियुक्तीसाठी वाढवेकर वेगवेगळी कारणं सांगत असल्याने राऊत यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी संबंधित शिर्षस्थ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यांना त्यांच्याकडून आलेली पत्र दाखवून नियुक्तीबाबत विचारणा केली असता, संबंधित अधिकारीही चक्रावले. आमच्याकडून असा पत्रव्यवहार झाला नाही अन् या पत्रावरच्या आमच्या नावे असलेल्या सह्या आम्ही केल्याच नाही, असे अधिकारी म्हणाले. त्यामुळे राऊत यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी वाढवेकर याच्याकडे विचारणा केली असता प्रारंभी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र ३० लाख रुपये परत करण्याची तयारी दाखवली. मात्र, प्रत्येक वेळी तो वेगवेगळी कारणे सांगून राऊत यांना त्रास देऊ लागला. त्याने फसवणूक केल्याचे आणि ही रक्कम परत करण्याची त्याची इच्छा नसल्याचे ध्यानात आल्यामुळे राऊत यांनी बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. आरोपीने आपल्याला बनावट ई-मेल पाठवून सोलापूर आणि पुण्यासह विविध शहरात नियुक्तीच्या नावाखाली हेलपाटे मारायला लावल्याचेही सांगितले. ठाणेदार सुधीर नंदनवार यांनी तक्रारीची शहानिशा करवून घेतल्यानंतर बुधवारी आरोपी गिरीश वाढवेकरविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचे कलम ४२०,४६८ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याचे सहकलम ६६ (क,ड) अन्वये गुन्हा नोंदविला.
‘सीईओ’पदाचे आमिष दाखवून ३० लाख हडपले
By admin | Updated: March 31, 2017 02:45 IST