लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - नागपुरात खरेदीसाठी आलेल्या चंद्रपूरच्या एका किराणा व्यापाऱ्याचे तीन लाख रुपये धावत्या ऑटोत दोन महिलांनी लंपास केले. तहसील पोलीस ठाण्यात याप्रकरणी शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रपूरच्या तिरुपतीनगरात राहणारे अनिल माधवदास डेंगाने (वय ४९) यांचा किराणाचा व्यवसाय आहे. ते इतवारीतील किराणा ओळीतून माल खरेदी करतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास खरेदीसाठी ते नागपुरात आले. बसमधून उतरल्यानंतर गणेशपेठ स्थानकाजवळून ते एका ऑटो (मॅक्सी) रिक्षात बसले. किराणा ओळीत नेहमीच्या दुकानात येऊन खरेदी झाल्यानंतर रक्कम देण्यासाठी त्यांनी आपली बॅग उघडली असता त्यातील ३ लाख ८ हजारांची रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. डेंगाने ज्या ऑटोत बसले त्याच ऑटोत दोन महिला बसल्या होत्या. त्यांनी डेंगाने यांचे लक्ष विचलित करून त्यांच्या बॅगमधील रोकड चोरल्याचा संशय आहे. त्यांनी या घटनेची तक्रार तहसील ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.