तस्करीची शक्यता : वन विभागाकडे सोपविले नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी १२६२६ त्रिवेंद्रम-दिल्ली केरळ एक्स्प्रेसच्या जनरल कोचमधून २९ कबूतर पकडले. यात कुणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी या कबूतरांवर लाखो रुपयांचा सट्टा लावण्यात येत असल्यामुळे त्यांना दुसऱ्या मोठ्या शहरात नेण्यात येत असल्याची शक्यता आरपीएफने व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरपीएफचा जवान विकास शर्मा यास रेल्वेगाडी क्रमांक १२६२६ केरळ एक्स्प्रेसमध्ये अवैधरीत्या पक्ष्यांची तस्करी करण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेली माहिती त्याने वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांना सांगितली. त्यांनी निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एक चमू गठित केली. केरळ एक्स्प्रेस दुपारी १.४५ वाजता प्लॅटफार्म क्रमांक एकवर आली. चमूने केरळ एक्स्प्रेसची तपासणी केली असता इटारसी एण्डकडील जनरल कोचमध्ये बसण्यासाठी असलेल्या बाकड्याच्या खाली कपडा झाकलेला एक बॉक्स आढळला. कपडा हटविला असता एका पिंजऱ्यात अनेक कबूतर ठेवलेले आढळले. पिंजऱ्यासह कबूतरांना आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. वनविभागालाही याची सूचना देण़्यात आली. वन विभागाचे रमेश आदमने यांनी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हे कबूतर एका विशेष प्रजातीचे असून त्यांच्यावर लाखो रुपयांचा सट्टा लावण्यात येत असल्याचे सांगितले. ही कारवाई वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, विकास शर्मा, रज्जनलाल गुर्जर, लोकेश भाकरे यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)
केरळ एक्स्प्रेसमध्ये २९ कबूतर आढळले
By admin | Updated: January 7, 2017 02:43 IST