सर्वेक्षण : जिल्ह्यात ५१७ शाळाबाह्य मुलेनागपूर : राज्यातील कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये व शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात ६ ते १४ वयोगटातील ५१७ शाळाबाह्य मुले आढळून आली. यातील २५४ मुलांनी अद्याप शाळा बघितलेली नाही.६३१७ प्रगणकांनी जिल्ह्यातील ५५७५०५ कुटुंबांना भेटी दिल्या. तसेच प्रत्येक गावात व छोट्या शहरात घरोघरी, बाजार, रेल्वे स्टेशन, बसस्टँड, वाहतूक , वीट भट्ट्या, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी अशा मुलांचा शोध घेतला. आढळून आलेल्या शाळाबह्य मुलांच्या बोटावर मार्कर पेनने शाई लावण्यात आली आहे. नागपूर तालुक्यातील ४६ मुले कधीच शाळेत गेलेली नाही. तालुकानिहाय त्यांची संख्या अशी, हिंगणा ३७,कामठी ६, काटोल २१, नरखेड १, सावनेर २३, कळमेश्वर ७, रामटेक ६, मौदा १८, पारशिवनी २४, उमरेड १७, कुही १० व भिवापूर तालुक्यातील ३८ मुलांचा यात समावेश आहे. यात मुलांची संख्या १११ असून १४३ मुली आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे व शिक्षणाधिकारी किशोर चौधरी यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात आली. यात शिक्षण, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आदींची मदत घेण्यात आली. (प्रतिनिधी)
२५४ मुलांनी अद्याप शाळाच बघितली नाही
By admin | Updated: July 7, 2015 02:44 IST