लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येत्या २५ आॅगस्टपासून गणेश उत्सवाला सुरुवात होत असून त्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी तयारी सुरू झाली आहे, सोबतच मनपा प्रशासनानेसुद्धा कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून अलीकडेच महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत यंदा शहरातील गणेश विसर्जनासाठी तब्बल २५० कृत्रिम तलाव तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.हे तलाव तीन प्रकारचे राहणार असून त्यापैकी काही रबर टँकचे राहणार आहेत तर काही जेसीबीने खड्डा खोदून तयार केले जाणार आहेत. तसेच काही ठिकाणी प्लायवूडच्या मदतीने टॅँक तयार केली जाणार आहे. याशिवाय यंदा सक्करदरा तलावात गणेश विसर्जनाला प्रतिबंध घालण्यावरही मनपा प्रशासन विचार करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र या निर्णयामुळे शहरातील गणेश विसर्जनाचा संपूर्ण भार हा फुटाळा तलावावर पडणार आहे. जेव्हा की कमी पावसामुळे अगोदरच फुटाळा तवालातील पाण्याची पातळी खोल गेली आहे तसेच अर्धा तलाव हा जलकुंभाने भरला आहे. अशास्थितीत येथे शहरातील सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यास तलावाचे आरोग्य धोक्यात येईल.शहरातील तलावासंबंधी मागील वर्षी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार गणेश विसर्जनापूर्वी फुटाळा व गांधीसागर तलावातील पाण्यात आॅक्सिजनचे प्रमाण ३.५ मिलीग्रॅम प्रति लिटर आढळून आले होते. परंतु गणेश विसर्जनानंतर तेच प्रमाण तब्बल २.५मिलीग्रॅमपर्यंत खाली आले होते. जलतज्ज्ञांच्या मते, तलावाच्या पाण्यातील आॅक्सिजनचे हे प्रमाण प्रति लिटर २ मिलीग्रॅमपेक्षा कमी झाल्यास तलावातील इको सिस्टिमला फार मोठा धोका निर्माण होईल. त्यामुळे मनपा प्रशासनाने त्यादृष्टीने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.पीओपीवर पूर्णत: बंदी हवीमनपा प्रशासनाने प्लास्टर आॅफ पॅरिस(पीओपी)च्या गणेशमूर्तीवर पूर्णत: प्रतिबंध घातला पाहिजे. परंतु मागील वर्षी अशा मूर्तींवर लाल निशाण लावण्याची अट घालण्यात आली होती. मात्र त्याचे कुणीही पालन करीत नसल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी माजी महापौर प्रा. अनिल सोले यांनी आपल्या कार्यकाळात पीओपीच्या मूर्ती रोखण्यासाठी एक स्क्वॉड तयार केले होते, शिवाय त्या माध्यमातून ठिकठिकाणी धाडीसुद्धा घालण्यात आल्या होत्या. मात्र यंदा गणेश उत्सव तोंडावर येऊन ठेपला असताना अजूनपर्यंत एकही कारवाई झालेली नाही. त्यामुळे यावर्षी पीओपीच्या मूर्तींची खुलेआम विक्री होणार आहे. ही विक्री रोखण्यासाठी मनपा प्रशासनातर्फे त्यावर पूर्णत: प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.मोठ्या मूर्तींसाठी शुल्क वसूल व्हावेशहरातील अनेक गणेश मंडळांमध्ये मोठी मूर्ती बसविण्यासाठी स्पर्धा लागलेली दिसून येते. यातून एकापेक्षा एक मोठ्या गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. मात्र त्याचवेळी अशा मोठमोठ्या मूर्तीच्या विसर्जनाची नवी समस्या तयार होत आहे. यावर उपाय म्हणून मनपा प्रशासनाने गणेशमूर्तींची एक उंची निश्चित करणे आवश्यक आहे. यात कुणी पाच फुटांपेक्षा अधिक उंचीची मूर्ती स्थापन करीत असेल तर त्यासाठी मनपा प्रशासनाने संबंधित मंडळाकडून अतिरिक्त शुल्क वसूल करावे, शिवाय गणेश विसर्जनानंतर त्याच शुल्कातून तलावाची साफसफाई करावी, असा सल्ला पर्यावरणप्रेमी संघटनांनी मनपा प्रशासनाला दिला आहे. शहरात पुढील २६ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान गणेश विसर्जन चालणार आहे. या १० दिवसाच्या काळात ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी फुटाळा तलाव येथे नि:स्वार्थ सेवा देणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
गणेश विसर्जनासाठी २५० कृत्रिम तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 01:18 IST
येत्या २५ आॅगस्टपासून गणेश उत्सवाला सुरुवात होत असून त्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी तयारी सुरू झाली आहे, सोबतच मनपा प्रशासनानेसुद्धा कंबर कसली आहे.
गणेश विसर्जनासाठी २५० कृत्रिम तलाव
ठळक मुद्देएनजीओचा पुढाकार : तलावातील आॅक्सिजन घटतोय