नागपूर : वाडी आणि मोवाड नगर परिषदेसाठी बुधवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी हिरीरीने सहभाग नोंदविला. त्यामुळे याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला. मोवाडमध्ये एकूण ८८.१९ तर वाडी येथे ६२.३६ टक्के मतदान झाले. दोन्ही ठिकाणी शांततेत मतदान झाले. तर कामठी नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत ५२.६१ टक्के मतदान झाले. उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले असून गुरुवारी मतमोजणी होणार आहे. वाडी नगर परिषदेची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती, हे विशेष. वाडी येथे एकूण २५ वॉर्ड असून एकूण १६० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. उन्हाळा असल्याने सकाळच्या वेळी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर गर्दी केली. सकाळी ११.३० वाजतापर्यंत ३६.८० टक्के, दुपारी १.३० वाजतापर्यंत ४०.७६ तर ३.३० वाजतापर्यंत ५१ टक्क्याच्या आसपास मतदानाची टक्केवारी पोहोचली. सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत एकूण १४ हजार ५७२ पुरुष तर १२ हजार १९९ महिला अशा एकूण २६ हजार ७६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची सरासरी ६२.३६ टक्के होती. मोवाड येथे एकूण १७ वॉर्डासाठी ६६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तेथेही दुपारपर्यंत ५२ टक्क्याच्या आसपास मतदान झाले. मतदान प्रक्रिया संपली तेव्हा ८८.१९ टक्के एवढे मतदान झाले. मोवाड नगर परिषदेसाठी ६९१८ मतदारांपैकी ६१०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची सरासरी ८८.१९ एवढी आहे. वॉर्ड क्र. १ मध्ये ७६० मतदारांपैकी ४३५ म्हणजे एकूण ८५.८० टक्के मतदारांनी मतदान केले. वॉर्ड क्र. २ मध्ये ८४.९९, वॉर्ड क्र. ३ मध्ये ९१.८१, वॉर्ड क्र. ४ मध्ये ९१.५५, वॉर्ड क्र. ५ मध्ये ८८.३८, वॉर्ड क्र. ६ मध्ये ८६.७९, वॉर्ड क्र. ७ मध्ये ९२.५०, वॉर्ड क्र. ८ मध्ये ८७.६२, वॉर्ड क्र. ९ मध्ये ८४.६८, वॉर्ड क्र. १० मध्ये ८९.६६, वॉर्ड क्र. ११ मध्ये ९०.११, वॉर्ड क्र. १२ मध्ये ८७.६९, वॉर्ड क्र. १३ मध्ये ८९.४७, वॉर्ड क्र. १४ मध्ये ८८.१६, वॉर्ड क्र. १५ मध्ये ९१.६२, वॉर्ड क्र. १६ मध्ये ८४.६३ आणि वॉर्ड क्र. १७ मध्ये ८३.७५ एवढे मतदान झाले. (प्रतिनिधी)
२३६ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद
By admin | Updated: April 23, 2015 02:36 IST