लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : पाेलीस पथकाने बाेर्डा शिवारात कारवाई करीत गुरांच्या अवैध वाहतुकीचा ट्रक पकडला. त्यात ट्रकचालकासह चार आराेपींना अटक केली असून, त्यांच्याकडून २३ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि.२४) सायंकाळी ४ ते ६ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये ट्रकचालक मुनीर नजीर खान (३०, रा. प्रतापपुरा दिंगी, ता. महालपूर जिंटाेक, राजस्थान), शाहरूख गाशी खान (२१, रा. ईस्लामपुरा, ता. महापूर, जि. टाेंक), सद्दाम बाबू खान हुसैन (२५, रा. चांदखासी, नानी पाेस्ट दिंगी) व सहादत अली मिश्री खाॅं (२२, रा. ईस्लामपुरा, ता. महापूर, जि. टाेंक) यांचा समावेश आहे. कन्हान ठाण्यातील पाेलीस पथक गस्तीवर असताना, त्यांना अवैधरीत्या गुरांची वाहतूक केली जात असल्याची गुप्त सूचना मिळाली हाेती. त्या माहितीच्या आधारे पाेलिसांनी बाेर्डा शिवारात नाकाबंदी सुरू केली. दरम्यान, एचआर-७३/५६७३ क्रमांकाच्या ट्रकला थांबवून तपासणी केली असता, ट्रकमध्ये ३४ बैलांना निर्दयतेने काेंबून त्यांची वाहतूक करताना आढळून आले. ही गुरांची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी ट्रकचालकासह चाैघांना अटक केली. त्यांच्याकडून ३ लाख ४० हजार रुपये किमतीची ३४ जनावरे (बैल) व ट्रक असा एकूण २३ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी आराेपींविरुद्ध भादंवि कलम ३४, सहकलम ११(१)(ए)(डी)(ई)(एफ)(आय) प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला आहे. ही कारवाई परिविक्षाधीन पाेलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अरुण त्रिपाठी, पाेलीस नाईक मुकेश हिवाळे, राहुल रंगारी, संजय बराेदिया, सुधीर चव्हाण, विशाल शंभरकर यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.