चंद्रशेखर बावनकुळे : खात येथील उपकेंद्राचे उद्घाटन मौदा : वीज वितरणाच्या क्षेत्रात येत्या दहा वर्षांत २० हजार कोटींच्या पायाभूत विकासाची कामे करण्याबाबत योजना तयार करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महावितरणच्या पायाभूत आराखडा योजना - २ अंतर्गत मौदा तालुक्यातील खात येथील नवनिर्मित ३३/११ केव्ही उपकेंद्राचे उद्घाटन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. ग्रामपंचायतस्तरावर ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून राज्यात २३ हजार तरुणांना लवकरच रोजगार उपलब्ध करून दिला जात असून यामुळे गावातील विजेसंबंधीची कामे गावातच केल्या जातील. अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता आणि प्रादेशिक संचालकांचे अधिकार वाढवून महावितरणचे विकेंद्रीकरण केल्याने आता प्रत्येक कामाकरिता मुंबईला जाण्याची गरज राहिलेली नाही, अनेक प्रश्न स्थानिक स्तरावरच सुटतील, वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी नागपूर जिल्ह्याला तब्बल दोन हजार कोटीचा निधी दिला असून याशिवाय जिल्हा नियोजन समितीमार्फ़त दरवर्षी ४० कोटीचा निधी व दुरुस्ती आणि देखभालीसाठी २०० कोटी दिल्या जात आहे, शेतकऱ्यांनी कृषीपंपांना कॅपासिटर लावावेत यासाठी योजना तयार करण्याच्या सूचना बावनकुळे यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. येत्या दहा वर्षांत राज्यातील ४० लाख कृषिपंप सौरऊर्जेवर चालावेत यासाठी योजना तयार असून नागपूर शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांमुळे काढण्यात आलेले खांब व इतर सामग्रीचा वापर शेतकऱ्यांना वीज जोडणीसाठी वापरण्यात यावे जेणेकरून २० कोटींच्या सामग्रीत ५० कोटींची कामे करणे शक्य होणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. प्रास्ताविक महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता आर. जी. शेख यांनी केले.(प्रतिनिधी)
१० वर्षांत २० हजार कोटींची कामे
By admin | Updated: December 23, 2016 01:40 IST