नागपूर : ‘पोलिओमुक्त भारत’ अभियानांतर्गत शनिवारी नागपूर जिल्ह्यातील ० ते ५ वर्ष वयोगटातील २ लाख १० हजार ४११ बालकांना लस पाजली. यात शहरातील १ लाख ९२ हजार ३८७ तर ग्रामीणमधील १ लाख ९२ हजार ३८७ बालकांचा समावेश होता. आज लसीकरणातून सुटलेल्या बालकांना २ फेब्रुवारीपासून ३ दिवस व शहरी भागात सलग ५ दिवस घरोघरी जाऊन पोलिओ लस दिली जाणार आहे. पोलिओ लसीपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्ह्यात २०९ ट्रांझिट टिमद्वारे बसस्टँड, रेल्वेस्टेशन, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी व १३० मोबाइल टीमद्वारे कामगार, भटके लोक, रस्त्यावरील मजुरी करणा-या लोकांची मुले यांना पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत.
शहरात पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ महाल येथील प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र येथे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नगरसेविका श्रद्धा पाठक, सुमेधा देशपांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, पल्स पोलिओ नोडल अधिकारी डॉ. वैशाली मोहकर आदी उपस्थित होते. महापौर तिवारी यांनी अनन्या पाठक या बालिकेला पोलिओ डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ केला. नागपुरात भविष्यात एकही पोलिओ रुग्ण आढळू नये यासाठी नागपुरातील सर्व पालकांनी आपल्या पाच वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मनपाअंतर्गत येणा-या दहाही झोनमध्ये एकूण १,५२९, ग्रामीणमध्ये २,३४३ असे एकूण ३,८७२ बुथ लावण्यात आले होते. लसीकरणाची जबाबदारी ८,४८७ कर्मचा-यांवर सोपविण्यात आली होते. नागपूर जिल्ह्यात ४ लाख ७१ हजार ५५५ बालकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. शहरात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या नेतृत्वात नोडल अधिकारी वैशाली मोहकर आणि अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांच्या देखरेखीत तर, ग्रामीणमध्ये आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.