नागपूर : एम्स रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांना येत्या ३० एप्रिलपर्यंत १९८ अतिरिक्त खाटा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती विभागीय आयुक्त संजीवकुमार व एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. यासंदर्भात त्यांनी वेगवेगळे प्रतिज्ञापत्र सादर केले.
गेल्या २५ मार्च रोजी उच्च न्यायालयाने एम्समध्ये कोरोना रुग्णांना एक आठवड्यात १९८ अतिरिक्त खाटा उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला होता. तसेच, यापैकी ५० टक्के खाटा ऑक्सिजन सुविधेसह असाव्यात असे सांगितले होते. त्यानुसार, यासंदर्भात ३१ मार्च रोजी बैठक घेण्यात आली आणि हे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी शंतनू गोयल व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सरदेशमुख यांची समिती स्थापन करण्यात आली. १९८ अतिरिक्त खाटा उपलब्ध करून देण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या संपूर्ण कामासाठी अग्निशमन, लिफ्ट लायसन्स, एचएसडी टँक एनओसी, डीजी सेट एनओसी यासह विविध परवानग्यांची आवश्यक आहे. त्यासाठीही प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत, असे न्यायालयाला सांगण्यात आले.
---------
धर्मशाळा इमारतीत ६० अतिरिक्त खाटा
सध्याची गंभीर परिस्थिती पाहता एम्सच्या धर्मशाळा इमारतीत ५ एप्रिलपासून ६० अतिरिक्त खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहितीही न्यायालयाला देण्यात आली.
------------
पुढील सुनावणी बुधवारी
यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर सोमवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने सदर प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेतले व राज्य सरकारच्या विनंतीवरून प्रकरणावर येत्या बुधवारी पुढील सुनावणी निश्चित केली.