‘ट्रामा’तील पदांना मंजुरी : १०० खाटांचे होणार मेडिकलचे सेंटरनागपूर : आहे त्या मनुष्यबळात सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ‘ट्रॉमा केअर सेंटर’च्या १८० विविध पदांची निर्मिती करण्यास शासनाने शुक्रवारी मान्यता दिल्याने या सेंटरला नवे ‘बुस्टर’ मिळाले आहे. यामुळे लवकरच ३० खाटांचे हे ट्रॉमा केअर सेंटर १०० खाटांची होण्याची शक्यता बळावली आहे. मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरला ३०१ पदांची गरज आहे. या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता, परंतु ट्रॉमा केअर सेंटर सुरू केल्यावरच पदे मिळतील असे खुद्द वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने (डीएमईआर) स्पष्ट केल्याने मेडिकलने आहे त्या मनुष्यबळात मे महिन्यात ‘ट्रॉमा’ सुरू केला. याचे लोकार्पण नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. मनुष्यबळ नसल्याने सुरुवातीला ३० खाटांमधून हे सेंटर सुरू करण्यात आले. दरम्यान उच्च न्यायालयाच्या, नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाने २९ आॅक्टोबर २०१५ रोजी दिलेल्या आदेशान्वये अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर येथील विभागांसाठी वरिष्ठ निवासी संवगार्साठी, इंडिक्रिनोलॉजी व न्युरोलॉजी या नवीन विभागांसाठी, अध्यापकांची, वर्ग ३ आणि वर्ग ४ संवर्गासाठी आवश्यक पदे भरतीचे आदेश दिले होते. आदेशाच्या दिनांकापासून ही पदे तीन महिन्याच्या कालावधीत निर्माण करून पुढील तीन महिन्यात पदभरती करण्याच्या सूचना केल्या होत्या. याशिवाय ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित करण्याच्या सूचनाही उच्च न्यायालयाने दिल्या होत्या. त्यानुसार उच्च न्यायालयाच्या आदेशास अनुसरून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांकडून या संदर्भात कारवाई सुरू करण्यात आली. त्यानुसार या सेंटरसाठी वर्ग १ ते ३ ची १३६ पदे मंजूर करण्यात आली. यात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, कार्यालय अधीक्षक, भौतिकोपचार तज्ञ, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक परिसेविका, अधिपरिचारिका आदी पदांचा समावेश आहे. त्याशिवाय वरिष्ठ निवासींची ११ पदे, प्रयोगशाळा, रक्तपेढी, क्ष-किरण, ईसीजी, एमआरआय तंत्रज्ञ आदींची ३३ काल्पनिक पदे निर्मितीसही शासनाने मान्यता दिली आहे.(प्रतिनिधी)
१८० पदांचे ‘बुस्टर’
By admin | Updated: June 11, 2016 03:17 IST