नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या कोरोनाच्या १६२ रुग्णांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. मेडिकलचा ट्रॉमा केअर सेंटरसह इतरही वॉर्डात आग प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी ही तात्पुरती सोय करण्यात आल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, मेयोचा सर्जिकल कॉम्प्लेक्समध्येही (डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल) आग नियंत्रणाच्या आवश्यक सोयी नाहीत.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे अग्निकांडात दहा बालकांचा हकनाक जीव गेल्याच्या घटनेला विशेषत: शासकीय रुग्णालयाने ‘फायर’ व ‘इलेक्ट्रिक ऑडिट’ला गंभीरतेने घेतले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रुग्णालयांना ‘फायर ऑडिट’ करण्याचा सूचना केल्या आहेत. त्यानुसार मेडिकलने तत्काळ पावले उचलित ‘फायर ऑडिट’चा प्रस्ताव अग्निशमन दलाकडे पाठविला आहे. मेडिकलच्या जुन्या इमारतीसह पाच वर्षांपूर्वी रुग्णसेवेत सुरू झालेल्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आवश्यक आग प्रतिबंधक उपाययोजना नाहीत. यामुळे कधीही धोका होऊ शकतो. सुत्रानुसार, याला घेऊन मेडिकल प्रशासनाने जिल्हाधिकारी ठाकरे यांना भेटून आग प्रतिबंधक उपाययोजना होईपर्यंत कोरोनाचे नवे व जुने रुग्ण मेयोत दाखल करावे, असा प्रस्ताव दिला होता. यावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण अध्यक्ष व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा अन्वये प्राप्त अधिकाऱ्यांचा वापर करून फायर सुरक्षाप्रणालीबाबत कार्यवाही पूर्ण होईपर्यंत कोविड रुग्णांना मेडिकलमध्ये भरती न करता मेयोत दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.
- मेयोच्या कोविड हॉस्पिटलमध्ये आग नियंत्रणाची पूर्तताच नाही
मेयोचा सर्जिकल कॉम्प्लेक्सचे दोन वर्षांपूर्वी झालेल्या ‘फायर ऑडिट’मध्ये आग नियंत्रण यंत्रणा बसविण्याच्या सूचना केल्या होत्या. यात रुग्णालयाच्या बांधकामानुसार पाण्याची टाकी, वीज नसल्यास पाणीपुरवठ्यासाठी पंप, वेळप्रसंगी बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग, अग्निशामक उपकरण, हायड्रन्ट व्यवस्था, स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म, पम्प हाउस व स्प्रिंकलर आदींची सोय करण्यास सांगण्यात आले होते. परंतु याची पूर्तताच झाली नाही. यामुळे अग्निशमनचे ना हरकत प्रमाणपत्रच मिळाले नाही.
-मेयोमध्ये कोरोनाचे ५२ रुग्ण
मेडिकलमध्ये कोरोनाचे १६२ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या सर्व रुग्णांची प्रकृती स्थीर करून त्यांना पुढील उपचारासाठी मेयोच्या कोविड हॉस्पिटलमध्ये पाठविले जाणार आहे. तूर्तास एकाही रुग्णांना पाठविलेले नसल्याची माहिती आहे. मेयोमध्ये कोरोनाचे ५२ रुग्णभरती आहेत. विशेष म्हणजे, मेडिकलच्या तुलनेत मेयोमध्ये कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
-कोरोनाबाधितांची स्थिती
मेडिकल १६२ रुग्णभरती
मेयो ५२ रुग्णभरती