नागपूर : जिल्ह्यामध्ये ‘ऑक्सिजन’चा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असताना सोमवारी मोठा दिलासा मिळाला. भिलाई येथील स्टील प्लांटमधून महाराष्ट्रात ऑक्सिजनचा पहिला टँकर दाखल झाला.
ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेल्या विशेष टँकर्सची संख्या देशभरात मर्यादित आहे. त्यामुळे ऑक्सिजन वाहून न्यायचा कसा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला व विशेष टँकर्सची उपलब्धता करून देणाऱ्या कंत्राटदारासोबत समन्वय साधला. सोमवारी १६ टन ऑक्सिजन नागपुरात दाखल झाले आहे. हा साठा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. रात्रीपर्यंत आणखी ३६ टन ऑक्सिजन दाखल होणार आहे. दररोज म्हणजे सकाळी आणि रात्री नागपुरात भिलाई येथून ऑक्सिजनचा पुरवठा सुरू राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.