स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : ५ लाख ७० हजारांचा ऐवज जप्तनागपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये ट्रकसह चोरून नेत असलेला १४ टन कोळसा पकडला. यात एकूण ५ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कामठी शहरातील बंगाली कॉलनी परिसरात गुरुवारी सकाळी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कामठी परिसरात गस्तीवर असताना ट्रकमध्ये कोळसा चोरून नेला जात असल्याची माहिती या पथकातील काही अधिकाऱ्यांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी या भागाची पाहणी केली असता त्यांना एमएच-०४/डीएस-४५४० क्रमांकाच्या ट्रकमध्ये कोळसा भरलेला असल्याचे आढळून आले. चौकशीअंती हा कोळसा चोरीचा असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी ट्रकसह कोळसा जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये ७० हजार रुपये किमतीचा १४ टन कोळशासह एकूण ५ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, लक्ष्मीकांत दुबे, प्रमोद बन्सोड, सूरज परमार, मंगेश डांगे आदींनी पार पाडली. (प्रतिनिधी)
१४ टन कोळसा पकडला
By admin | Updated: July 4, 2015 03:07 IST