जाटतरोडीतील रुग्णाचा मृत्यू : रुग्णांची संख्या ३५नागपूर : स्वाईन फ्लूने आणखी एका रुग्णाचा बळी घेतला आहे. या आजारामुळे आतापर्यंत १२ रुग्णांचा मृत्यू झाला असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३५ झाली आहे. विशेष म्हणजे, जाटतरोडी वसाहतीतील स्वाईन फ्लूने हा दुसरा मृत्यू आहे. यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाने या वसाहतीकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. जाटतरोडी इंदिरानगर येथील रहिवासी कैलास मस्के (२४) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार कैलास मस्के यांना ३० जानेवारी रोजी, मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात भरती करण्यात आले होते. याच दिवशी त्यांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविले असता त्यांना हा आजार असल्याचे निष्पन्न झाले. सुरुवातीपासूनच त्यांची प्रकृती गंभीर होती. मागील तीन दिवसांपासून ते व्हेंटिलेटर होते. मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वी याच वसाहतीतील एका रुग्णाचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाला होता. त्याचा आणि मस्के यांचा संबंध कुठे येतो का, याची माहिती मेडिकलच्या रोगप्रतिबंधक विभागाचे प्रमुख डॉ. अरुण हुमणे घेणार असल्याची माहिती आहे. मेडिकलकडून आज पाच संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता पाचही नमुने निगेटिव्ह आले आहेत. (प्रतिनिधी)
स्वाईन फ्लूचा १२ वा बळी
By admin | Updated: February 4, 2015 01:01 IST